लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील लोकमंगल साखर कारखान्यात गुरुवारी (दि. १९) कुसुम कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत कामगारांची तपासणी करण्यात आली.
केंद्र शासनाच्या वतीने कुष्ठरोग प्रसार शून्यातून आणण्याच्या उद्देशाने कुसुम कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र ही मोहीम राबविण्यात येत आहे. दि. १६ ते २० डिसेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत गुरुवारी (दि.१९) तालुक्यातील लोकमंगल साखर कारखाना येथे कारखान्यातील २७५ कामगारांची तपासणी करण्यात आली. यापैकी चार जण कुष्ठरुग्ण आढळले. कुष्ठरोग सहाय्यक संचालक एम आर कोरे, डीएनटी वैद्यकीय अधिकारी ए. ए. घोगरे, तालुका आरोग्य अधिकारी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली. यावेळी अवैद्यकीय पर्यवेक्षक यु. आर. शिंदे, एनएमए सुजित साळुंके, कुष्ठरोग तंत्रज्ञ महेश साळुंके व आरोग्यसेवक जवादे यांनी कारखान्यातील एकूण २७५ कामगारांची तपासणी केली. यावेळी उपस्थित कामगारांना कुष्ठरोगाबाबत माहिती सांगण्यात आली.