लोकमंगल (Lokmangal) शुगर्सच्या तीन कारखान्यांपैकी लोहारा (खुर्द) (ता. लोहारा) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रिज लिमिटेड या साखर कारखान्याने २०२३-२४ च्या गळीत हंगामात ४ लाख १९ हजार ८६१ टन एवढे उस गाळप केले असुन शेतकऱ्यांना ११४ कोटी ३ लाख रुपये ऊसाचे बिल अदा केले आहे. शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली ही रक्कम एफआरपी नुसार त्यांना देणे असलेल्या रकमेपेक्षा २५ कोटी ६४ लाख रुपयांनी जास्त दिल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असल्याची माहिती कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
या प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे की, तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली साखर कारखान्याने सन २०२३-२४ या गळीत हंगामात ४ लाख १९ हजार ८६१ टन एवढे उसाचे गाळप केले. शेतकऱ्यांना एफआरपी दर २१०५ रुपये प्रति टन असा देय होता. परंतु कारखान्याने सरासरी २७१६ रुपये दर दिला. हा दर एफआरपी पेक्षा टनामागे ६१० रुपयांनी जास्त होता. यातुन शेतकऱ्यांना एकूण ८८ कोटी ३९ लाख रुपये देणे सरकारी नियमानुसार अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात ११४ कोटी ३ लाख रुपये देण्यात आले. ही जादा रक्कम २५ कोटी ६४ लाख रुपयांनी जास्त आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली ही रक्कम नियमानुसार देणे असलेल्या रकमेपेक्षा २९.०१ टक्क्यांनी जास्त आहे असे प्रशांत पाटील यांनी सांगितले.
कारखान्याने काही ऊस बिल उशिराने दिलेले आहेत. परंतु आता १०० टक्के दिले आहेत. सरकारने ऊस तोड कामगारांना त्यांच्या मजुरीत ३४ टक्के वाढ मंजुर केली आहे. त्यांचे पेमेंट कारखाना लवकरच अदा करील असेही श्री. पाटील यांनी सांगितले. २०२३-२४ या गळीत हंगामातील संपूर्ण बिल अदा केले आहे. त्यामुळे लोकमंगल माऊली साखर कारखाना २०२४-२५ चा गळीत हंगाम असाच विक्रमी गाळप करण्यास कटिबद्ध आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी जसे सहकार्य केले तसेच याही वर्षी करावे, तसे झाल्यास खात्रीने हाही हंगाम आपण यशस्वी करू असे ते म्हणाले.
सध्या पाऊस चांगला पडला आहे आणि सर्वत्र त्याचा फायदा घेऊन एकरी १०० टन ऊस उत्पादन करण्याचा मानस शेतकऱ्यांत वाढत आहे. ऊसाची शेती आणि साखर कारखानदारी यांचे भवितव्य चांगले असल्याचे आशादायक वातावरण आहे. शेतकऱ्यांनी चांगले सहकार्य केले तर कारखाना प्रगतीपथावरच राहील आणि शेतकरीही चांगला भाव मिळुन सुस्थितीत राहतील असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, पराग पाटील, वरिष्ट सरव्यवस्थापक छगन भोगाडे, सहाय्यक सरव्यवस्थापक व्यंकटेश वाघोलीकर, प्रशासकीय अधिकारी राजकुमार सगर, चिफ केमिस्ट नरेश रामपुरे, विद्युत सहाय्यक गणेश मोरे, ऊस पुरवठा अधिकारी पंडित चव्हाण, श्री. बिराजदार, केन अर्कोटंट शाम साळुंके, प्रमुख लिपीक किरण पाटील, श्री. फंड आदी उपस्थित होते.