महाराष्ट्राला समृद्ध असा राजकीय विचारांचा नैतिक वारसा लाभलेला आहे. राजमाता (rajmata) जिजाऊ यांच्या मार्गदर्शनातून शिवाजी महाराजांनी रयतेचे कल्याण साधनारे स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य हा एक विचार आहे. या विचाराचा वारसा पुढे नेणारी सुभेदार मल्हार होळकरांची सून म्हणजे अहिल्याबाई होळकर (Ahilyabai holkar). त्यांचे कर्तृत्व दीपस्तंभासारखे आहे. म्हणतात ना, ‘वादळाने जगाच्या इतिहासातून अधून मधून मानवी देह धारण केलेला आहे. जगातील क्रांतीकारकाच्या रूपाने आशा वादळांनी जगाला हादरे दिलेले आहेत. पुण्यश्लोक, अहिल्यादेवी प्रजेच्या मनावर प्रेमाचे राज्य करणारी धर्म पारायण, रणरागिनी, कुलभूषण अहिल्याबाई होळकर म्हणजे अशाच प्रकारच्या प्रचंड वादळी वाऱ्याचे मानवीरूप! रोगट आणि कूजलेल्या कर्मकांडाचे स्तोम माजविलेल्या, सामाजिक गुलामगिरीच्या व्यवस्थेला लाथाडून स्वातंत्र्य,समता, बंधुत्वाच्या उदात्त विचारांना आणि शाश्वत मूल्यांना देशात व देशाबाहेरच्या भूमीत रुजविण्याचा प्रयत्न या क्रांतीज्योतीने हयातभर केला.हे वादळी वारं सतत देशाच्या पाठीवर तीस वर्षे आत्मविश्वासाने घोंगावत होतं…. त्याचा व्याप व वेग प्रचंड होता.म्हणून तर सर्वधर्मसमभाव जपवणाऱ्या अहिल्याबाईने वादळ वाऱ्यात दिवा लावून, धर्म आचरणाची ज्योत पेटवून, माणुसकीचा धर्म पाळला. हाच धर्म व विचार आमचा मार्गदर्शक आहे. पुण्यश्लोक म्हणून संबोधल्या गेलेल्या अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी सीना नदीच्या काठावर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील ‘चोंडी’ या गावी झाला. निजाम राजवटीच्या काळात सीना नदीच्या काठावरील चोंडी हे गाव बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये होते. सुभा औरंगाबाद होता. पुण्यश्लोक अहिल्याबाईचा जन्म गावचे पाटील मानकोजी शिंदे व आई सुशीला बाईच्या पोटी झाला वडील मानकोजी शिंदे हे संस्कारीत धार्मिक वृत्तीचे पोथ्या, पुराण, पूजा, शिस्त, शांतता या गुणाचा प्रभाव अहिल्याबाईवर झाले. शिवाय आई सुशिलाबाई पण विनयशील, धार्मिक वृत्तीची आई होती. घरात भागवत,पुराण कीर्तनाचे आयोजन करणाऱ्या त्या आदर्श गृहिणी होत्या. वडील चौंडेश्वराच्या मंदिरात पूजा करत. नंतर ध्यानस्थ बसत. वडीलाप्रमाणे आहिल्यापण डोळे बंद करून देवाच्या आराधना करत. म्हणजेच आई-वडिलांच्या संस्काराचा प्रभाव बालपणापासून त्यांच्यावर होता.
खऱ्या अर्थाने त्याकाळी स्त्रियांना शिक्षणाची संधी नव्हती; परंतु घरातील वातावरणामुळे झालेले संस्कार, शिक्षणाची व्यवस्था केल्यामुळे अहिल्यांना लिहिता वाचता येत होते. एवढेच नाही तर त्यांना मोडीलिपीचे ज्ञान अवगत होते. अहिल्याबाईच्या लग्नाबाबत आख्यायिका सांगितली जाते. ती अशी ‘सोनी गावच्या नदीकाठी शंभू महादेवाचे मंदिर. तिथे बाल- मैत्रिणी सोबत नदीमध्ये वाळूचे ‘शिवलिंग’ तयार करत होते. तेवढ्यात दोन घोडेस्वार वेगाने जात होते. तरीपण धाडसी अहिल्याबाई तिथेच शिवलिंगाचे संरक्षण करत थांबली. त्यामुळे दोन घोडेस्वारांना आश्चर्य वाटले की,हिच्या सर्व मैत्रिणी घाबरून इथून गेल्या; परंतु ही मुलगी मात्र इथेच थांबली. या मुलीची चौकशी केली ही मुलगी माणकोजी शिंदे पाटलाची लेक आहे.
माणकोजी शिंदे पाटील धनगर समाजाचे होते,बाजीराव पेशवा व सुभेदार मल्हार होळकर यांना समजले त्यामुळे दोघांचा मुक्काम गावात पडला. सायंकाळी मंदिरात आहिल्याबाई तेलवात लावण्यास आली होती त्यावेळी गुरुजी तात्या पणतोजी बाजीरावांना वाकून नमस्कार करताना पाहून आठ वर्षाची अहिल्याबाई गुरुजींना मनाली, “तात्या तुम्ही तर आम्हाला सांगतात कुणापुढे झुकायचे नाही खुशाल….! तुम्ही त्यांना साष्टांग दंडवत घालता कोण आहेत…?” तिचा धाडसीपणा व करारीपणा पाहून बाजीराव पेशवे यांनी मल्हारवाना आपली सून म्हणून स्वीकारण्याचा आग्रह धरला. मल्हाररावांना ही सून म्हणून आवडली. हा प्रस्ताव मानकोजी पाटलासमोर ठेवण्यात आला. पाटलांनी घाबरत हो म्हणाले, त्यांच्या आयुष्यातला आनंदाने हर्षित करणारा हा प्रसंग… परंतु माणकोजी शिंदे पाटील सुभेदार मल्हारवाना म्हणतात, तुम्हाला आम्ही काय देणार. आमची परिस्थिती बेताची…? सुभेदार मल्हारराव होळकर मुळात मनाने श्रीमंत ते म्हणतात,”आम्हाला तुमचे काही काही पण नको फक्त माझा मुलगा खंडेराव साठी पत्नी व माझी सून म्हणून अहिल्याबाई पाहिजे”.असे म्हणताच माणकोजी व सुशिलाबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पुण्यात शनिवार वाड्यात २० मे १७३३ रोजी खंडेराव होळकर व अहिल्याबाई चा अनोखा विवाह सोहळा पार पडला,
”लेक-लाडकी शिंदे पाटलाची
सून झाली होळकरांची”
या विवाह सोहळ्याला छत्रपती शाहू महाराज हजर होते. हा विवाह सोहळा म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील सोनेरी पान होय.
सुभेदार मल्हार होळकर व गौतमाबाई यांनी अहिल्याबाई चे गुण ओळखून तिला आपला मुलगा मानला तिला राज्यकारभार, न्यायदान,युद्धकला, तह करणे, हिशोब, लेखन, वाचन याबाबतची आवड निर्माण करून दिली. पत्रव्यवहार सुद्धा अहिल्याबाईच्याच नावाने करू लागले. लेक मनाच्या सुनेवर विश्वास होता.
पती खंडेराव त्यांच्यावर जिवापाड प्रेम करत असत.पतीवर्तेचा धर्म पाळत. त्यांच्या अंगावर पांढरी साडी, डोक्यावर पदर, कपाळी भागात मोठ्या आकाराचा पिवळा गंध, गोल चेहरा, हातात महादेवाची पिंड यावरून पतिव्रतेची सात्विकता प्रतियास येते, त्यामुळे खंडेरावांना सुद्धा आपल्या पत्नीबद्दल नेहमीच आपुलकी व प्रेम होते. एवढेच नाही तर आपल्या पतीस गुन्हादोषा सहित स्वीकारले.त्यांच्याबद्दल नेहमीच मनात नीतीमान जागा ठेवली. १५ऑगस्ट १९३५ रोजी खंडेराव यांना शिलेदारी मिळाली. पुढे खंडणी वसुलीवरून सुरजमल जाटाचा मराठ्यांशी झगडा झाला. कुंभेरीच्या किल्ल्याला २४ मार्च १७५४ रोजी सुभेदार मल्हार होळकर यांनी वेढा दिला. परंतु सुरजमल जाट यांच्यासोबत लढण्याची जबाबदारी खंडेरावावर आली, त्यांनी तब्बल दोन महिने किल्ला लढवला. त्यात अचानक अंगावर तोफा आल्या खंडेराव गतप्राण झाले; परंतु ही झुंज शर्तीने लढवली शूर वीर खंडेराव जर सलग दोन महिने युद्धभूमीवर होते. तरी काही इतिहासरांनी त्यांना व्यसनी, नादिक का ठरवले ? हा माझा खडा सवाल आहे…!
अहिल्याबाईंना सती जाण्यापासून सासरे सुभेदार मल्हार होळकर यांनी परावर्तित केले, मी तुझ्यात माझा खंडू पाहतोय.म्हणजे सुनेला मुलगा मानणारा जगातला एकमेव सासरा मला वाटतो. खरंच अहिल्याबाईने प्रसंगानुरूप भावनेपेक्षा कर्तुत्वाला महत्व दिले.सती जाण्याचा बेत रहित केला. म्हणजेच प्रस्थापित समाजाच्या उलट्या काळजाला त्यांनी हात घातले.
सुभेदार मल्हार होळकर शूर, धाडसी, सहनशील, सर्वगुण,निपुण डोळ्यासमोर मुलाचा मृत्यू झाल्यामुळे ते खचले…. परंतु त्यांनी अहिल्याबाईंना धीर दिला, सर्व गुणसंपन्न बनवले. कारण त्यांचा आघाध विश्वास होता. नियतीच्या मनात विपरीत चाललेले, मल्हारावाचा कान ठणकत होता त्यातच २० मे १९६६ रोजी त्यांना मृत्यूने गाठले. त्यामुळे साध्वी अहिल्याबाई दुःखात बुडून गेल्या. कारण त्या पित्याप्रमाणे प्रेम करणाऱ्या सासर्यांच्या अम्रवृक्षाप्रमाणे दाट छायेत मार्गक्रम करीत होत्या. त्यांचा फार मोठा आधार नाहीसा झाला. पुढे मुलगा मालेराव अल्पायुषी ठरला, २७ मार्च १७६७ वयाच्या २२ व्या वर्षी मृत्यू पावले, पुढे मुलगी मुक्ता बाईचे लग्न भिल्ल समाजाच्या तरुण व कर्तबगार यशवंतराव फणसे सोबत लावून दिले; परंतु नातू नथोबा १५ नोव्हेंबर १७९० ला मृत्यू पावला. पुढे जावई यशवंतरावाचे ३ नोव्हेंबर १७९१ रोजी निधन झाले. शेवटी आईल्याबाईंना शोक अनावर झाला. अन म्हणाल्या, “आता कशासाठी जगू…!परमेश्वर माझी का परीक्षा पाहतो…!” असे जरी अपरिमित परिस्थिती निर्माण झाली तरी पण आप्तजनाच्या दुःखातून स्वतःला सावरून राज्यकारभार व प्रशासन यांच्यावर लक्ष देण्यास तो सुबरी कमी पडल्या नाही.
राजव्यवस्था :-
धर्मशास्त्रानुसार अहिल्याबाईंना गादीवर बसता येत नव्हतं त्यामुळे त्यांनी तुकोजी होळकर यांना गादीवर बसून राज्यकारभार मात्र स्वतः पाहिला, माधवराव पेशवे यांनी खाजगी जहागिरीचा अधिकार अहिल्याबाईकडे व लष्करी अधिकार तुकोजीकडे दिले पण अहिल्याबाई लष्करी व्यवस्थेवर लक्ष ठेवून होत्या.
राज्यकारभार करताना गुणी,लायक माणसाची पारख त्यांना होती, त्यांच्याकडून काम करून घेत असत, प्रजेवर त्यांचे खूप प्रेम होते कुणाच्या दडपणाखाली निर्णय घेत नव्हत्या.
लहान- संस्थानातील राजे महाराजांच्या कचेरीतील खंडणी वसूल करणारे गुमासते यांची निवड केली. राज्यकारभारांत ढवळाढवळ त्यांना चालत नव्हती,खंडणी वसुलीचे काम सक्तीने होते यापासून मिळणारा मोबदला, पैसा, स्वतःसाठी वापरला नाही,प्रजेला लुबाडून सरकारी खजिना भरला नाही याचे उत्तम उदाहरण ‘खरगोण’ या गावातील तापीदास व बनारसीदास हे दोघे एकमेका मागून एक वारले. त्यामुळे जवळचे नातेवाईक त्यांच्या पत्नीला हस्तगत करण्यासाठी त्रास देत होते, ही संपत्ती तुमची आहे गोरगरिबांना दान करायचे असेल तर करू शकता… किंवा कारभारासाठी द्यायचा असेल तर देऊ शकता यावर तुमचाच अधिकार आहे, असे ठणकावून सांगणारी जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजा नंतर महाराणी अहिल्याबाई होळकरच म्हणावी लागेल.
राज्यकारभार करताना कधीच स्वतःसाठी सैन्याचा वापर केला नाही, दरबारात फेरफटका मारताना सुद्धा केला नाही अशी चोख राज्यकारभार करणारी ती महाराणी होती.
न्याय निवाडा –
अहिल्याबाईंचे न्यायदान वाकबदार होते, अन्यायाला थारा नव्हता, त्याकाळी काही कायदेशीर प्रक्रिया न्यायदानाची नव्हती परंतु सारासार विचार करून न्यायदान केले जायचे. न्यायदानाचे काम सुलभ व्हावे म्हणून ‘वहीवाटदार’ व ‘वीसदार’असे अधिकारी नेमले. शिवाय राज्यातील खटले, तंटे मिटविण्यासाठी वकिलाची नेमणूक केली.
न्यायदान करताना आपल्या मुलाला किंवा आपल्या पतीला सुद्धा शिक्षा दिल्याचे पुरावे सापडतात. म्हणजेच एवढेच नाही तर पेशव्यापुढे जर वाद उपस्थित झाला तरी त्या मागेपुढे पाहत नव्हत्या. जे काही न्यायिक असेल त्यावर ठाम भूमिका मांडत होत्या. एवढेच नाही तर लग्नातील ‘कन्यादान पद्धत’अहिल्याबाईने बंद केल्याची पुरावे आढळतात. म्हणजेच त्यांनी हुंडाबंदी केली.
भिल्ल, गोंड, रामोशी हे लोक राज्यातील येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकरूची लूट करीत असत. एकवेळेस भिल्लांच्या म्होरक्यांना पकडून अहिल्याबाई समोर उभे केले, त्यावेळी तो म्होरक्या म्हणतो, मासाहेब आपण द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. कारण आमच्याकडून आगळीक होतेय.परंतु आम्हास उपजीविकेचे साधन नाही मग आमचे घर कसे चालायचे…? हे ऐकताच दिवानांना आदेश दिला,यात यात्रेकरूने दरडोई एक कवडी कर बसवा त्यातून काही पैसा त्यांना द्या,यांच्यावर यात्रेकरूच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवा.
काहीजण शेती करू इच्छित असेल तर त्यांना सरकारी जमिनीचे पट्टे करून द्या म्हणून त्यांना न्यायाची देवता म्हटले जाते.
आर्थिक व्यवस्थापन-
राज्यातील अंतर्गत कलह- भांडणामुळे आर्थिक व्यवस्था अस्थिर होती. परंतु होळकरांच्या राज्यात आर्थिक सुबत्ता होती. कारण त्याकाळी वार्षिक उत्पन्न १,७५,३७००० होते. त्यांच्या राज्यात तीस वर्षाच्या काळात कधी दुष्काळ जाणला नाही. या काळात शेतकरी खुश होते.कारण शेतीमध्ये खूप पीक काढत त्यामुळे त्यांना मिळकत चांगली होती. शेतकऱ्यांना एक बिघा जमिनीवर साधारणपणे एक रुपया कर लावत असत. कर वसुलीसाठी ‘कमाविसदार’सारखे अधिकारी नेमले.
अहिल्याबाईंनी शेतीसोबत उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले,नवीन बाजारपेठ निर्माण केल्या ‘महेश्वर’येथे कापडाची मोठी बाजारपेठ, फणसेपुरा गोविंदपुरा,मंगळवारपुरा इत्यादी बाजारपेठा निर्माण करून व्यापाराला चालना दिली.
या काळात टोल वसूल केला जात असे. डोंगरदऱ्यातील घाट, रस्ते, सरहद असतील सायर वसूल केला जात असत परंतु टोल धान्याचे व वजन यावरून ठरत असत. काही बाबींना यातून सूट दिली. जुलमाने कर वसुली करणारी असतील तर कमविस्ताराकडून वसूल करून घेत असत.त्या फार बारीक लक्ष देत असत प्रसंगी त्यांचे कान उघाडनिसुद्धा करीत होत्या.
धान्य मोजण्यासाठी शेर,मनी आणि मापे होती. तर महेश्वर येथे नाण्याची टाकसाळ होती तिथे पैसा,आना, रुपया अशी नाणी पाडली जात. चांदी व सोन्याची नाणी सुद्धा अल्प प्रमाणात पाडली जात. सुवर्णमुद्रा ही असाव्यात.घंटे, कवडी, दमड्या कमी किमतीच्या नाण्याचा वापर होत असत.
सामाजिक परिस्थिती-
अहिल्याबाईंच्या काळात स्त्रियांचे क्षेत्र मर्यादित म्हणजे ‘चूल आणि मूल’ परंतु यांच्याबाबत वडील मानकोजी शिंदे पाटील व सासरे सुभेदार मल्हार होळकर या दोन्ही घराण्यात स्त्रियांना मान सन्मान होता, याचा प्रभाव अहिल्याबाईच्या सामाजिक जीवनावर झालेला दिसून येतो.
राज्यात लूटमार दरोडेखोराचे थैमान माजले होते.जनता त्रस्त होती. ही बाब लक्षात आल्यानंतर भिल्ल व डाकूचा तर बंदोबस्त करणे गरजेचे होते.त्यामुळे आपल्या लोकांचे संरक्षण झाले पाहिजे. जनता गुन्यागोविंदाने नांदली पाहिजे म्हणून त्यांनी फर्मान काढले. की जो कोणी भिल्ल व दरडेखोर यांचा बंदोबस्त करेल त्यांच्यासोबत माझ्या मुक्ताबाईचे लग्न लावून देले जाईल. हा विडा यशवंतराव फणसे या भिल्ल समाजाच्या तरुणाने उचलला. तो पूर्ण केला त्यावेळी अहिल्याबाईंनी आपल्या कन्येचा विवाह यशवंतराव यांच्यासोबत लावून दिला. त्यांना सन्मानाने वागवलं. मला वाटते समाजाच्या हितासाठी स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह लावून देणाऱी, मी जात पाहत नाही, त्यांचे कर्तुत्व पाहते असं सामाजिक समतेचा संदेश देणारी राजमाता जगाच्या पाठीवर होणे नाही.
शरीफ भाई या मुस्लिम शूरवीरास सेनापती पदी नियुक्त केले. त्यांनी चंद्रवंताचा बीमोड केला, दिलेली जबाबदारी चोखपणे पार पडल्यामुळे त्यांचा मानसन्मान करण्यात आला, आपल्या पंक्तीत जेवणाचा मान त्यांना दिला. त्यामुळे तर टिपू सुलतान व निजाम हे नेहमी अहिल्याबाईंचा आदर करीत असत.
कोणत्याही समाजाचा असू द्या गोरगरिबांना अन्नदान, दानधर्म एवढेच नाही तर देवधर्माच्या ठिकाणी भाविकांचा स्नान करता यावे म्हणून ‘जलकुंड’बांधले. जसे पैठण येथे नाथाच्या दर्शनाला हजारो भावीक येताना’ नागघाट’बांधला. यात्रेकरुला निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून धर्मशाळा बांधल्या. अनेक घाट बांधले. संत जनाबाई,मुक्ताबाई, कान्होपात्रा अशा वेगवेगळ्या समाजातील स्त्रिया प्रसिद्धीस आल्या, विधवा स्त्रियांना दत्तक पुत्र वारसा हक्क मिळवून दिले, कोणत्याही जाती धर्माचा असू द्या जर अडचणीत असेल तर त्याला दानधर्माच्या रूपात मदत करत शिवाय जेवण करून पाठवत असत. १४ जानेवारी १७८४ रोजी एक लाख रुपयाचा संकल्प करून हाती दान केल्याचा उल्लेख आढळतो.
अहिल्याबाईंनी सर्व जाती धर्मातल्या अंध-अपंग, खुळे,पीडित एवढेच नाही तर प्राण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली.
हुंडाबंदी सारखा कायदा केला शिवाय अनिष्ट चालीरीती व रूढी परंपरेला तीलांजली दिली. भक्षकाकडेच रक्षकाचे काम सोपूवून त्या मुख्य प्रवाहात आणले.
धार्मिक व्यवस्था-
अहिल्याबाई मुळात:खूप आध्यात्मिक व धार्मिक होत्या. सर्व धर्माबद्दल तिचा उत्कट भाव होता. त्यांनी या कार्यासाठी खाजगी जहागिरीच्या उत्पन्नातून दानधर्म केले. औंढा नागनाथाच्या पूजेसाठी विठ्ठल भट,त्र्यंबक भट या पुजाऱ्यांची नेमणूक केली,त्या कडक उपवास करीत असत. पैठणचे पारायणकार अनंतरूपी यांनी अंबड परगाण्यातील गावाचे उत्पन्न लावून दिले.
अहिल्याबाई जवळ नेहमी रामायण, महाभारत, शिवलीलामृत आदी ग्रंथ होते.
सूर्यनमस्कार,कोटी लिंगाचरणी, शिवकवच,नवग्रहाचा जप, कुलदेवता श्री मल्हारी मार्तंड यास अभिषेक व जप केला जाई हे धर्मपालन केल्याने सुख शांती मिळते ही त्यांची धारणा होती म्हणूनच 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला. शिवाय उध्वस्त मंदिराचा जीर्णोद्धार केला.
त्यांनी काशी,अयोध्या,गया,उजैन, ओंकारेश्वर,नाशिक, वनी,भीमाशंकर, रामेश्वर अशा अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या.केदारनाथ येथे त्यावेळी मनुष्य वस्ती नव्हती ३००० फूट पेक्षा जास्त उंचीवर दगडी धर्मशाळा व पाण्याचे जलकुंड बांधले यावरून त्याच्या दृष्टीक्षेपाचा प्रतय येतो.
भाविकांना तीर्थाच्या ठिकाणी ऊन, थंडी,वारा,पाऊस यामुळे त्यांचे हाल होत. प्रसंगी कित्येकांना आजारपण येऊन ते मृत्युमुखी पडत असत. या दुःखाची जाणीव यांना होती म्हणूनच गोरगरीब यात्रेसाठी निवासाची सोय व्हावी म्हणून एक ना अनेक धर्मशाळा बांधल्या शिवाय अन्नदानाची पण सोय केली.
त्यांच्याजवळ स्वतःच्या धर्माप्रमाणे दुसऱ्याच्या धर्माबद्दल आदर होता.
परधर्म सहिष्णुता असल्यानेच सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्याबद्दल आपुलकी व प्रेम श्रद्धा होती म्हणून तर म्हैसूरचे टिपू सुलतान सुद्धा पेशव्या इतकाच मान त्यांना देत असत. यावरून त्यांच्या धर्म सहिष्णुता भाव असल्याची ठळक प्रचिती येते.
*पर्यावरण* –
पर्यावरणाचा समतोल कायम असावा म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूस किंवा दुतर्फा झाडे लावली. पडीक जमिनीवर व डोंगरावर झाडे लावून वृक्षरोपणासारखे उपक्रम त्याकाळी राबविले. शेतकऱ्यांनी वीस झाडे लावावेत त्यांची निगराणी करावी त्यातील ११ झाडे शेतकऱ्याच्या मालकीची तर ९ झाडे शासकीय मालकीची असावी. त्यामुळे जमिनीची धूप व पर्यावरणामधला समतोल सहज राखला जाऊ शकतो हा विचार त्यांनी लोकांच्या सहकार्यातून प्रत्यक्षात उतरवला.
*साहित्य विषयाची आवड त्यामुळे लोक कलावंतांना आसरा -*
अहिल्यादेवी निरनिराळ्या प्रकारच्या कलावंतांच्या कलागुणांचे कौतुक करीत. काशी मधील मंदिरे,विहिरी, धर्मशाळा पाहून कवी मोरोपंत भारावून गेले व अहिल्याबाईचा कर्मयोग समजला त्यांनी विसाजीपंतासोबत अहिल्याबाई यांना भेटण्यासाठी दरबारात गेले. मोरोपंत यांनी अहिल्याबाई चे खूप कौतुक केले. काव्य ‘आर्या ‘च्या माध्यमातून ते म्हणतात,
देवीअहिल्याबाई,
झालीस जगप्रयांत तू धन्य,!
न न्याय -धर्म निरता,अन्या कलीमाजी ऐकली कन्या..!! त्यावर अहिल्याबाई म्हणतात की, तुम्ही महान कवी आहेत एखादा काव्यग्रंथ आपल्या हातून लिहिला जावा,त्यास द्रव्याची चिंता नसावी कलाकाराला यापेक्षा काय अपेक्षा असते. असे कौतुक करण्यासाठी संस्कारच असावे लागतात.
अनंत फंदी सारख्या कवीचे उत्थान केले.यात कला व रचनेतील कौशल्य,आवाज,गाण्याची फेक देण्याची कला यामुळे अहिल्याबाई फांदींना कवी न म्हणता कविराज माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीवर कवन करण्यापेक्षा देवाचे गुण,भजने गावे, त्यामुळे तुमचे कल्याण होईल, हे वाक्य फार जिव्हारी लागलं.लावणीची रचना न करता तिथून देविकाची गाणे गाऊ लागले तेथून पुढे त्यांना उपदेश पर फटके लिहिण्याची सवय लागली. खरंच साहित्य हे मानवी संस्कृतीचे सिंचन करते यातून राजमाता अहिल्याबाईंच्या साहित्य मनाची जाण अधोरेखित होते.
समारोपप्रसंगी :-
सुप्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ प्लॅटो म्हणतात की,’राजा हा तत्वज्ञ असला पाहिजे तरच त्यांचे राज्य आदर्श होऊ शकते’ खरंच त्या तत्त्वज्ञ राज्यकर्त्या होत्या.त्यांना सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक जाण होती. कितीही संकटे आली तरी त्यांनी त्यातून मार्ग काढला. परधर्मसंहिष्णूता हा भाव, समानतेची वागणूक,स्वतःच्या सद्विवेकबुद्धीला पटेल असच वागणं, प्रजाहितदक्षता या गुणामुळे राज्यावर परचक्राची भीती नव्हती. वाणी, वर्तन व चारित्र्य याबाबतचा आपला वेगळा पैलू जगासमोर ठेवणारी अलौकिक शक्ती पुन्हा दृष्टीक्षेपास पडेल काय…? कारण ज्याचेच गुणगान
केले जाते ज्यांची न्यायव्यवस्था चोख, पराक्रम, कर्तुत्व, प्रशासन, महिलांना आत्मसन्मान मिळवून देणारी, मानसशास्त्र ज्यांचे पक्के, त्याग व समर्पण,दानधर्म गुण ज्यांच्यात असतो, ‘ जे का रंजले गांजले, त्यासी म्हनू जे आपुले’ हा भाव त्यांच्यात होता.म्हणून खाजगी संपत्ती समाजाच्या कल्याणासाठी वापरणाऱ्या, खरंच…! त्यांच्या कामाचे हे स्वरूप पाहिले की असं वाटतं एखादी बाईमाणूस एवढं अवाढव्य काम कसं करू शकते…? प्रश्नांची सोपी उत्तर शोधण्याचा कल आपल्याकडे असतो, विलक्षण काम करून दाखवणाऱ्या माणसांना संत, महामानव पदवी दिली की त्यांनी हे काम कसं केलं असेल हे समजून घेण्याच्या कोणी फंदात पडत नाही बहुतेक त्यामुळेच अशा प्रकारचं काम कोणाच्या हातून होताना दिसत नाही परंतु हे काम आपल्या हातून करावयाचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने आपली क्षमता व कल ओळखून, त्या क्षमता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपण हे काम कशासाठी करतो याची जाणीव असेल देह निश्चित असेल तर नियोजन असेल स्वतःला ताणण्याची तयारी असेल, कोणती गोष्ट अशक्य नाही हेच अहिल्याबाईच्या कार्यकर्तुत्वातून शिकता येते, अहिल्याबाईच्या कार्याची महती प्रत्येक समाजापुढे पोहोचावेत आणि त्याचा समाजातल्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी वापर केला जावा, हीच माफक इच्छा…!
जर का आम्ही छोट्या-छोट्या बांधामध्ये,
छोट्या-छोट्या वादामध्ये, अडकून पडलो तर कसे राजमाता अहिल्याबाईच्या विचाराचे वारसदार म्हणून पात्र ठरू शकू…? याचा विचार आपण केला पाहिजे.
जर गौतमा बाईसारखी सासू मिळाली नसती
सुशिलाबाई सारखी आई मिळाली नसती
तर संस्काराचे विद्यापीठ नसते
तर खऱ्या अर्थाने अहिल्याबाई घडल्या असत्या का….?
म्हणून उद्याच्या आईल्याबाई तुमच्या घराघरात घडवायच्या असतील तर लेकीला शिक्षण व संस्कार देणारी सुशिलाबाई व दक्ष व कर्तुत्वान सासू गौतमाबाई निर्माण होणे काळाची गरज आहे.
राजमातेबद्दल एवढंच म्हणता येईल,
स्वकर्तृत्वाची दिसे प्रचिती l
तिथे नकळत कर हे जुळती l
सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यातील पाणी पुसणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!
@ डॉ.बळीराम पांडे
अर्थशास्त्र विभाग,
देवगिरी महाविद्यालय,छत्रपती संभाजीनगर.