लोहारा (Lohara) तालुक्यातील मार्डी येथे मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत महसूल (Revenue) प्रशासन तहसील कार्यालय लोहारा यांचे वतीने शुक्रवारी (दि.२१) क्षेत्रीय गाव भेट कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संगायो योजने अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा पात्र अर्जदार यांना लाभ देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, पुरवठा नायब तहसीलदार श्रीमती खडे मॅडम, मार्डी येथील श्रीमंत पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, उपसरपंच शरद कदम, योगेश देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अव्वल कारकून अशोक शिंदे यांनी केले. तहसीलदार कोळेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर महसूल प्रशासनातील विविध विषयासंबंधी व विविध योजना संबंधी माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. त्यामध्ये शेत रस्त्याबाबतच्या विविध तरतुदी याची माहिती मंडळ अधिकारी मणियार यांनी दिली. तसेच ॲग्रीस्टॅग या योजनेची माहिती ग्राम महसूल अधिकारी किशोर पवार यांनी दिली. कार्यक्रमात पुरवठा नायब तहसीलदार खडे मॅडम यांनी पुरवठा विभागातील माहिती ग्रामस्थांना दिली. संगायो/ इंगायो विभागातील विविध स्वरूपाच्या योजनांची माहिती श्री पटेल यांनी दिली. तसेच निवडणूक विभागामार्फत बीएलओ श्री माणिकशेट्टी सर यांनी माहिती दिली. यावेळी संगायो योजने अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा पात्र अर्जदार यांना लाभ देण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी ग्रामस्थांना विविध प्रकारची माहिती दिली व लोकांच्या अडीअडचणी विषयी चर्चा करून कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला. तलाठी दिपक रेड्डी यांनी आभार मानले.