धाराशिव, दि.१९ – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली.
सकाळी १० वाजता या पदयात्रेची सुरुवात श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथून करण्यात आली. पदयात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक धनंजय काळे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. चंद्रसेन जाधव,व खो खो विश्वचषक स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती जिल्ह्याची कन्या अश्विनी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन उपस्थित विद्यार्थी, अधिकारी व नागरिकांनी केले. यावेळी खो खो विश्वचषक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू अश्विनी शिंदे हिने पदयात्रेला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथून सुरू झालेल्या पदयात्रेत शासकीय परिचारिका महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भारत स्काऊट गाईड, नेहरू युवा केंद्र, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, पोदार इंटरनॅशनल स्कुल, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी व खो खो संघटना, सरस्वती विद्यालय, तेरणा हायस्कूल, भाई उद्धवराव पाटील प्रशाला, श्री.श्री.रवीशंकर विद्या मंदिर, भारत विद्यालय, शरद पवार विद्यालय, आर्य चाणक्य विद्यालय, सह्याद्री व बिल गेट्स नर्सिंग स्कुल यासह अन्य शाळा व विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. पोदार स्कुलचे ढोलपथक व आर्य चाणक्य विद्या मंदिरचे लेझीम पथक पदयात्रेत अग्रस्थानी होते.
पदयात्रेत विद्यार्थ्यांनी दिलेल्या ” छत्रपती शिवाजी महाराज की जय ” या घोषणेने आसमंत दुमदुमून गेला. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी हे राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व शिवाजी महाराजांचे मावळे यांच्या वेशभूषेत सहभागी होते. पदयात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे पराक्रम आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात मदत झाली. पदयात्रा धाराशिव शहरातील मुख्य मार्गाने निघून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हा क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार वृषाली तेल्लोरे यांनी मानले.
