लोहारा तालुक्यातील माकणी येथील भारत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत यश मिळविले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आयोजित जिल्हास्तरीय अविष्कार २०२५ नवोपक्रम संशोधन स्पर्धा उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे आयोजित करण्यात आली होती. या जिल्हास्तरीय अविष्कार २०२५ नवोपक्रम संशोधन स्पर्धेसाठी बीएसएस माकणी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यानी पारितोषिक मिळवले आहे. तसेच त्यांची निवड पुढील स्पर्धेसाठी विद्यापीठ पातळीवर झाली आहे. या स्पर्धेत योगिता राठोड हिने प्रथम, सुप्रिया मुगळे हिने द्वितीय तर दत्ता बिराजदार याने तृतीय पारितोषिक पटकाविले आहे. महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव व उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचेही अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविष्कार समितीचे चेअरमन प्रा. डॉ. बालाजी जावळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सूर्यकांत कांबळे यांनी तर डॉ. अनिल गाडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.















