धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कलाउत्सवात लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेचा संघ ठरला अव्वल ठरला असून हा आता राज्यस्तरीय कला महोत्सवात धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) धाराशिव यांनी दिनांक ३० सप्टेंबर, २०२४ रोजी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून एक असे ८ संघ सहभागी झाले होते. लोहारा तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना सास्तूर निवासी दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर सलग दुसऱ्यांदा जिल्हास्तरीय समूहनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले असून सास्तूर निवासी दिव्यांग शाळेचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या दिव्यांग प्रशालेतील कु. संध्याराणी कदम, रितेश देशमुख, महेश पवार, भाग्येश इस्लामपूरे, कु.भाग्यश्री कांबळे या विद्यार्थ्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करीत बहारदार आदिवासी समूहनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली व नेत्रदिपक यश संपादित केले. विजयी संघास जिल्हास्तरीय कला उत्सवाच्या समन्वयक सुचित्रा जाधव, श्रीमती जगताप, सुनिता वाकोडे, श्रीमती भोसले, श्री. राजेंद्रजी यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. सदर नृत्यासाठी प्रविण वाघमोडे, शंकरबावा गिरी, निशांत सावंत, संजय शिंदे, प्रयागताई पवळे, सुनिता कज्जेवाड, राजू स्वामी, ज्ञानोबा माने यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे सास्तूरच्या सरपंच शितल पाटील, ग्रामपंचायत सदस्य बालाजी कांबळे, गोविंद यादव, संस्थेच्या सचिव निर्मलाताई बदामे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे, प्राचार्य बी.एम. बालवाड आदींनी अभिनंदन केले आहे.
———–
मला जन्मतःच एक पाय नाही. इतर सर्वसामान्य मुलांना नृत्य करताना पाहून मला नेहमी दु:ख व्हायचे. मी कधी एवढ्या मोठ्या व्यासपीठावर नृत्य करेन असे वाटले नव्हते. मी सास्तूर निवासी दिव्यांग शाळेत आल्यानंतर माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून, मलाही इतरांसारखे नृत्य करता येईल याचा विश्वास माझ्या गुरुजनांनी दिला. मला प्रोत्साहित केले. आणि मी आत्ता कृत्रिम पाय लावून नृत्य करण्याचा आनंद घेतोय.
- महेश पवार (निवासी दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थी)
