एक पेड माँ के नाम या संकल्पनेनुसार लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयात वृक्ष लागवड करण्यात आली. या रोपांना विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे नाव दिले. रोपांची योग्य ती काळजी, जतन व संगोपन करण्याची यावेळी शपथ देण्यात आली.
तालुक्यातील सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेने एकूण ४०० रोपांची खरेदी सुमारे प्रशालेच्या स्वाधीन केली. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी एक झाड आपल्या आईला समर्पित करून लावावे व त्याची योग्य ती काळजी घ्यावी आणि शालेय परिसर नयनरम्य व निसर्गमय करावा असा या उपक्रमाचा उद्देश होता. पंचक्रोशीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण देणारी एकमेव प्रशाला असा नावलौकिक करण्यासाठी आजचा हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारची रोपे “श्री स्वयंभू नर्सरी, धाराशिव येथून आणून संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद पवार, एसबीआय बँकेचे लोहारा शाखेचे मॅनेजर प्रमोद नामा, साधनव्यक्ती श्री मुगळीकर सर यांच्यासह उपस्थित सर्व माता-पालक, गुरुजन वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२७) रोपांची लागवड करण्यात आली. रोपाला विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे नाव दिले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना रोपांची योग्य ती काळजी, जतन व संगोपन यासंबंधीची शपथ देण्यात आली. सप्तपर्णी, कदंब, बकुळ, लिंबू, बॉटल पाम, चाफा, अशोक, मलेशियन नारळ, वड, पिंपळ व गुलाब इत्यादी प्रजातीची रोप लागवड मोठ्या उत्साहात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक डॉ. रवींद्र मुगळे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील माने, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन प्रशालेचे नंदनवन करण्याचा ध्यास घेतला.