लोहारा तालुक्यातील भातागळी येथील मानाच्या काठीचे दि. १२ एप्रिलला शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान झाले होते. या मानाच्या काठीचे बुधवारी (दि. २४) रात्री उशिरा भातागळी गावात आगमन झाले. यावेळी गावकऱ्यांनी या मानाच्या काठीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
तालुक्यातील भातागळी येथील मानाची काठी भाविकासह कटल्या, नंदी, कावड इत्यादींच्या सोबत दि. १२ एप्रिलला शिखर शिंगणापूरकडे रवाना झाली होती. भातागळी ते शिखर शिंगणापूर हे जवळपास ३०० किमी चे अंतर पार करत १७ एप्रिल रोजी ही काठी शिखर शिंगणापूर मध्ये पोहोचली. शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या मुख्य मंदिरात काठीचा विवाह सोहळा संपन्न झाला. शिखर शिंगणापूरमध्ये भातागळीच्या महादेवाच्या काठीला विशेष असा मान आहे. भातागळीची काठी ही शंभू महादेवाची अर्धांगिनी अर्थात पार्वतीचे रूप मानले जाते. भातागळी गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी या काठीला अर्थात नवरीला सजवले जाते. तिची मनो भावे पूजा केली जाते. भातागळी गावात एकाही घरावरती गुढी न उभारता काठी हीच सार्वजनिक गुढी उभी केली जाते. पाडव्यानंतर तीन दिवस काठी महादेवाच्या मंदिरामध्ये उभी असते. परिसरातील व गावातील नागरिक दररोज मनोभावे पूजा अर्चा, भजन, करतात तसेच दररोज संध्याकाळी काठीची प्रत्येक समाजाकडून आरती केली जाते.
काठी शिखर शिंगणापूरमध्ये पोहोचल्यानंतर एक दिवस मुक्कामी होती. तसेच परतीचा सहा दिवसाचा प्रवास करून या काठीचे लोहारा तालुक्यातील भातागळी येथे बुधवारी (दि. २४) रात्री उशिरा आगमन झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात या काठीचे स्वागत केले. काठीचे गावात आगमन झाल्यानंतर भातागळी गावच्या यात्रेला प्रारंभ होतो. दि.२५ व २६ एप्रिल रोजी ही यात्रा संपन्न झाली. या दरम्यान भातागळीसह पंचक्रोशीतील भाविकांनी मानाच्या काठीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.