सध्या समाजात वेगवेगळ्या कारणावरून तेढ निर्माण होत असलेले अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. त्यामुळे समाजा- समाजात दुरावा निर्माण होताना दिसून येत आहे. परंतु एका गरीब मुस्लिम व्यक्तीचे घर मुसळधार पावसात पडले. त्याला घर बांधण्यासाठी मदत व्हावी म्हणून मराठा समाजातील युवकांनी आर्थिक मदत करून आधार दिला आहे.
अडचणीच्या वेळी एकमेकांना मदत करणे, त्याला आधार देणे ही आपली संस्कृती, शिकवण आहे. मग तो कोण्या जातीचा, धर्माचा आहे हे पाहिले जात नाही. तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथेही अशीच एक घटना घडली आहे. तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील रियाज रफिक मुलानी यांचे घर मागील तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पडले होते. त्यामुळे या कुटुंबाला राहायला जागा नव्हती. गावकऱ्यांनी त्या कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथील आरक्षण आंदोलनास जमा केलेल्या वर्गणीमधील काही रक्कम शिल्लक राहिली होती. ही रक्कम आपण रियाज मुलानी याच्या कुटुंबास देऊन त्यास त्यांचे घर दुरुस्तीसाठी मदत करू असा निर्णय मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला. त्याप्रमाणे रविवारी (दि.२९) सकाळी ही आर्थिक मदत मुलानी कुटुंबियांना देण्यात आली. यावेळी विजय लोमटे, विजय नरगाळे, विनोद मोरे, इंद्रजीत लोमटे, अनिल मोरे, मनोज गवळी, सत्यजीत भोसले, राहुल मुळे, आबा मुळे, उत्तम गाटे, देविदास जाधव, पंडित नरगाळे, बळी जाधव, रमेश जाधव, रामकिशन मुळे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.






