वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आ. निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. कोविड काळात त्यांनी मतदारसंघात एक हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले होते. विशेष म्हणजे आ. निलेश लंके यांनी स्वतः या कोविड केअर सेंटरमध्ये राहून रुग्णांची काळजी घेतली होती. त्यामुळे ते राज्यभर लोकप्रिय झाले आहेत. आता त्यांच्या माणुसकीचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
आ. निलेश लंके हे ८ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईहून पारनेरकडे येत असताना त्यांना पाम बीच रोडवरील न्हावा शेवा ब्रिजखाली एक कुटूंब दिसले. मुंबईत जोराचा पाऊस सुरू होता. अशा अवस्थेत ते कुटूंब त्या पुलाखाली निवारा घेत होते. त्यामुळे लंके यांनी गाडी थांबवून त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली असता ते बाळु शंकर पवार नावाचे गृहस्थ असल्याचे लक्षात आले. ते मुळचे उस्मानाबादचे होते. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी, दोन लहान मुले व बहिण तोळाबाई होती. हे कुटूंब दिवसभर जे काम मिळेल ते करून आपल्या पोटाची भुक भागवित होते व रात्री या पुलाखाली निवारा घेत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन आ. लंके यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना खायला दिले. त्यामुळे त्या कुटूंबाचे डोळे भरून आले. या पुलाखाली राहणाऱ्या कुटूंबाला पारनेर येथे हाताला काम व राहण्याची सोय करण्याची हमी दिली.
कामाची व राहण्याची व्यवस्था व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो आपण पारनेरला येणार का? असे आ. लंके यांनी त्यांना विचारले. या प्रश्नावर त्यांनी पारनेरला येण्याची सहमती दर्शवली. यावेळी या कुटूंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला. शुक्रवारी त्या कुटुंबीयांनी लंके यांना संपर्क केला होता. लवकरच त्यांची पारनेर येथे कामाची व निवासाची सोय आ. लंके यांच्याकडून करून देणार आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांशी त्यांचा संपर्क करून देण्यात येणार आहे.
या ठिकाणावरून आ. निलेश लंके यांच्या पूर्वी अनेक जण गेले असतील. यातील अनेकांनी त्या कुटुंबियांना गाडीतून पाहिलंही असेल. परंतु त्या कुटुंबाची अडचण ओळखून माणुसकीचे दर्शन दाखवत त्यांची चौकशी करून अडचण दूर करण्यासाठी आ. निलेश लंके यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.