वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रूग्णालय व उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयास रूग्णवाहिका देण्यात आल्या असून रविवारी (दि. ३) आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून या दोन्ही रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील व उमरगा येथील प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.विक्रम आळंगेकर यांच्याकडे आ. सतीश चव्हाण यांनी रूग्णवाहिकेच्या चाव्या सुपूर्द केल्या.
कोविड १९ संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने १६ एप्रिल २०२१ रोजी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात रू. 1 कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. आ. सतीश चव्हाण यांचा मतदारसंघ हा संपूर्ण मराठवाडा असल्याने कोवीड- १९ च्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेला निधी त्यांनी मराठवाड्यातील विविध शासकीय रूग्णालयांना यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी दिला आहे. काही महिन्यांपूर्वी कोविडच्या पार्श्वभूमीवर आ. सतीश चव्हाण यांनी उस्मानाबाद तसेच उमरगा येथील शासकीय रूग्णालयांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळी या दोन्ही ठिकाणी रूग्णवाहिकांची गरज लक्षात घेता आमदार निधीतून रूग्णवाहिका देण्याचे आश्वासन आ. सतीश चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आज पूर्तता केली.राज्यात कोविड विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपली वैद्यकीय सेवा देणारी यंत्रणा सर्व बाजूने सज्ज असणे आवश्यक आहे. रूग्णवाहिके अभावी कुणालाही प्राण गमवावा लागू नये यासाठी मी माझ्या आमदार निधीतून उस्मानाबाद व उमरगा येथील शासकीय रूग्णालयांसाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही रूग्णवाहिका उपलब्ध राहणार असून रूग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास या रूग्णवाहिकेची नक्कीच मदत होईल असा विश्वास आ. सतीश चव्हाण यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. उमरगा येथील रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार, तालुकाध्यक्ष संजय पवार, सतीश इंगळे, जगदीश सूर्यवंशी, बाबा पवार, सुरेश पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा सरपंच सुनीता पावशेरे आदींची उपस्थिती होती. तसेच उस्मानाबाद येथील रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, शहराध्यक्ष आयाज शेख, सतीश इंगळे, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, बालाजी इतबारे, राजकुमार मेंढेकर, बालाजी तांबे, एकनाथ चव्हाण आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.