वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील आरणी हे १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे.
लोहारा तालुक्यातील आरणी येथे दि. १ नोव्हेंबर रोजी लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी कोविड लसीचे पहिल्या डोसचे १०० टक्के लाभार्थी पूर्ण करण्यात आले. गावाची लोकसंख्या १३७१ असून यापैकी लसीकरणास पात्र ७४४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पात्र लाभार्थ्यां पैकी शेवटचे १०० नागरिक लसीकरण करून घेण्यास तयार नव्हते. त्यावेळी आरणीच्या सरपंच सविता संगशेट्टी, उपसरपंच सिद्धेश्वर लादे, आरोग्य सहायिका माने सिस्टर, आरोग्य सेविका बिराजदार सिस्टर यांनी सदर नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना लस घेण्यास तयार केले. लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज १२ ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केले जात आहेत. या व्यतिरिक्त प्रा. आ. केंद्र कानेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका बंदिछोडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनानुसार मोबाईल टीम तयार करून स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून सत्राच्या वेळेनंतरही नागरिकांना लस देण्याचे नियोजन केले आहे.गावातील १०० टक्के पात्र लाभार्थीनी लस घेतल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, कानेगाव यांनी सरपंच सविता संगशेट्टी, उपसरपंच सिद्धेश्वर लादे, ग्रामसेवक पी. जे. देडे यांचे आभार व्यक्त केले. तसेच दुसऱ्या डोस देय लाभार्थींना सुद्धा प्रवृत्त करुन दोन्ही डोस पूर्ण करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायिका, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत सेवक तसेच गावातील मदत करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.