वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
औसा शहराच्या विकासात भर घालणारी विकास कामे करतांना दर्जेदार असली पाहिजेत, परंतू ती वेळेत पूर्ण करावीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे लोकार्पण व नगर परिषद व्यापारी संकुल विकसित करणे, नगर परिषद सांस्कृतिक सभागृह, जलतरनिका (मोठे व लहान), जमालनगर तलाव येथे केफेटेरिया तयार करणे, किल्ला ते नगर परिषद कार्यालय मुख्य रस्ता घन कचरा केंद्र येथे संरक्षक भिंत बांधकाम करणे, कटघर गल्ली येथील हरित पट्टा विकसित करणे, समता नगर येथे पूल बांधकाम करणे, औसा नगर परिषद कार्यालय व फिल्टर प्लॉट येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे औसा नगर परिषदेतर्गंत विविध विकास कामांचे शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते औसा नगर परिषदेच्या प्रांगणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख, बसवराज पाटील नागराळकर, मुख्याधिकारी सुविधा फड आदिंची उपस्थिती यांची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक शहर म्हणून औसा शहराची ओळख आहे. शहराला तसं पाहिलं तर दीड हजार पेक्षा जास्तीच्या वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. एवढी मोठी परंपरा महाराष्ट्रात फार कमी शहरांना पाहायला मिळते. शहरं वाढत असतांना त्या शहरांमध्ये घनकचऱ्याचा प्रश्न आणि या शहरात घाणीचं साम्राज्य दूर करण्याकरिता भूमिगत नाल्यांची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे तेथे कुठल्याही परिस्थितीमध्ये डासांचा प्रादुर्भाव होणार नाही. याकडे दुर्लक्ष करु नये, याचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करावा लागणार आहे. औसा शहराचा विकास करण्यासाठी मी कायम पाठीशी असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. नगर परिषदेने सुनियंत्रित नियोजनबद्ध पद्धतीने शहराचा विकास करण्याकडेही भर द्यावा. तसेच नियंत्रित पद्धतीने शहरांची वाढ झाली, तर शहरातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणार आहेत. त्यासाठी शहरामध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, घनकचरा, व्यवस्थापन आणि पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे होत नाही, त्यामुळे या शहरात या अशा प्रकारच्या शहरांमध्ये आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. त्यामुळे यावर आता विकास कामे करावी लागणार असल्याचेहीं उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, औसा शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष उत्तम काम करत आहेत, आम्ही त्यांच्या विकासाला वेळोवेळी हातभार लावत राहू. नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी यावेळी प्रास्ताविक करून शहराच्या विकासाबाबत भूमिका मांडून शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमासाठी नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.