खरीप हंगामाच्या अनुषंगाने खते व बियाणे मुबलक प्रमाणात असून तुटवडा होणार नाही. तसेच कृषी निविष्ठा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती लोहारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तयारी केली आहे. तालुक्यात एकूण ४२ हजार ९०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून यंदा खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, रासायनिक खतांचा साठा केला आहे. कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा तुटवडा जाणवणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी दिली आहे. कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर नियंत्रण करण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी पथक प्रमुख आहेत. कृषी अधिकारी पंचायत समिती हे सदस्य सचिव आहेत. तसेच वजन मापे निरीक्षक व मंडळ कृषी अधिकारी हे सदस्य आहेत. खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बियाणे, खते, किटकनाशकांची खरेदी केली जाते. ही खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्ष राहून व प्रमाणित मान्यताप्राप्त कंपन्यांकडूनच खरेदी करावी व त्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य द्यावे. बनावट/भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करा. खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टन/ पिशवी, टॅग,खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकीटे सिलबंद / मोहोरबंद असल्याची खात्री करा. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतीम मुदत पाहुन घ्या. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. किटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करा. आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष/ दुरध्वनी/ इ-मेल/ एस.एम.एस./ इत्यादीव्दारे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी करताना घरगुती सुस्थितीत ठेवलेल्या बियाण्याची उगवणशक्ती तपासून व त्यास जैविक आणि रासायनिक बीजप्रक्रिया करून रुंद सरी वरंबा (बीबीएफ) अथवा टोकन पद्धतीने पेरणी केल्यास उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.