वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी लस घेणे गरजेचे आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हावासीयांना आवाहन केले आहे.
कोविड १९ ची तिसरी लाट येऊन धडकली आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणा याबाबतीत तयारी करत आहे. हे संकट भीती न बाळगता गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मात्र बरेच लोक निर्बंधांबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. आर्थिक चक्र वारंवार थांबणे परवडत नाही. प्रशासनाची दैनंदिन कामे मागे पडतात. सुनावण्या लांबतात. रोजंदारीवर काम करणाऱ्यांना सर्वाधिक फटका बसतो. त्यात कोरोना रात्रीच्या कर्फ्यु मध्ये झोपतो का असे टिंगल टवाळीचे सुर उमटत असतात. तसे पाहता जगात सर्वत्र निर्बंध लावताना थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.पण एका मुद्द्याचा विचार करू. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मेच्या सुरवातीला एका दिवशी (peak) १०००० अॅक्टिव रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात होते. त्यापैकी ५००० लोक विविध हॉस्पिटल्स, कोविड केअर सेंटर्स मध्ये उपचार घेत होते. जवळपास १०% लोकांना कमी अधिक प्रमाणात मेडिकल ऑक्सिजनची गरज होती.
आता जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक लोकांचे किमान एक लसीकरण पूर्ण आहे व ४५% हून अधिक रुग्णांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. आता omicron विषाणू तीनपट पाचपट गतीने पसरतो आहे. असे गृहीत धरल्यास peak मध्ये ३०००० अॅक्टिव रुग्ण असतील. त्यापैकी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ४% धरले तर १२०० रुग्णांना ऑक्सिजन लागेल. म्हणजे जवळपास दुसऱ्या लाटेपेक्षा थोडा कमी. ICU मध्ये २% रुग्ण धरले तर ६०० रुग्णांना उपचार घ्यावे लागतील. आता जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांची संख्या विचारात घेतली तर रुग्ण डॉक्टर प्रमाण हे व्यस्त ठरते. आज जिल्ह्यात १२०० हून अधिक ऑक्सिजन बेड, १८० व्हेंटिलेटर, त्याच्या दुप्पट ICU बेड, BIPAP व इतर साधनसामग्री, ५०० हून अधिक concentrators , ८ PSA ऑक्सिजन प्लांट, ३ LMO tank कार्यरत आहेत. पहिल्या लाटे पेक्षा ही परिस्थिती निश्चितच चांगली आहे. पण डॉक्टरांची संख्या याप्रमाणे वाढणे शक्य नाही हे लक्षात घ्यावे लागेल.
दुसऱ्या लाटेत आपल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी, नर्स, आरोग्य सेवकांनी एकेक जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली होती. त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या मृत्युदरात मोठी घट झाली. ऑक्सिजनचा एकेक टँकर आणण्यासाठी महसूल यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती. रुग्णांना औषधे, जेवण, ambulance अशा बाबतीत यंत्रणा , सामाजिक संस्था मदत करत होत्या. पोलिस विभागाने lockdown चे नियमन करण्यात मोठी भूमिका बजावली.
वाचणाऱ्या जीवांकडे पाहून समाधान वाटते मात्र आपल्याला सोडून गेलेल्या मित्र, कुटुंबीयांचे दुःख कधीही भरून निघत नाही.
मग अशावेळी संसर्गाची गती कमी करणे आणि लसीकरण पूर्ण करणे हे दोनच पर्याय प्रशासनासमोर उरतात. त्यामुळे विनाकारण गर्दी करणाऱ्या बाबी टाळणे आणि निर्बंध घालणे आवश्यक आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती की प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आपले व आपल्या कुटुंबीयांचे लसीकरण पूर्ण करून घ्या. या जिल्ह्याने भूकंपानंतर या कोविड च्या साथीत इतक्या मोठ्या प्रमाणावर आपले कुटुंबीय गमावले आहेत. हे पुन्हा होऊ नये यासाठी जबाबदारी ओळखा. लसीकरण करून घ्या. गर्दी टाळा. मास्क वापरा. आपले व आपल्या कुटुंबीयांचे रक्षण करा.
आपला,
कौस्तुभ दिवेगावकर
जिल्हाधिकारी उस्मानाबाद