वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील गुंजोटी पंचायत समिती गणात बेरोजगार मुक्त अभियान राबविण्याचा संकल्प पंचायत समिती सदस्या क्रांतीताई किशोर व्हटकर यांनी केला आहे. सदर अभियान राबविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
क्रांती व्हटकर यांच्या संकल्पनेतून प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, मुंबई शाखा किल्लारी व समर्पण सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गुंजोटी यांच्या सहकार्याने गुंजोटी पंचायत समिती गणातील १८ ते ३५ वयोगटातील युवक व युवतींना प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मुंबईच्या वतीने इलेक्ट्रॉनिक, वेल्डिंग, कन्स्ट्रक्शन आणि नर्सिंग सारख्या कोर्सचे एक महिन्याचे आय. टी. आयचे ऑनलाईन व प्रात्यक्षिक प्रशिक्षण मोफत देऊन राज्यातील नामांकित कंपनीत रोजगार मिळवून देण्यात येणार आहे. सध्या कोरोनामुळे रोजगार नसल्याने अनेकांना गंभीर परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. अनेकांच्या हाताला काम नसल्याने कित्येक युवक-युवती बेरोजगार आहेत. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण देऊन राज्यातील नामांकित कंपनीत रोजगार मिळवून दिला जाणार आहे. यासाठी गुंजोटी पंचायत समिती गणातील गुंजोटी, गुंजोटीवाडी, औराद, अहिल्यानगर, औराद तांडा क्रमांक एक व दोन येथील युवक व युवतींनी या आय. टी. आय. प्रशिक्षणासाठी क्रांती व्हटकर यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन आपली नाव नोंदणी करावी. आपला प्रवेश फॉर्म भरावा असे आवाहन क्रांती व्हटकर, प्रथमचे जिल्हा संपर्क अधिकारी सुमित कोथिंबीर यांनी केले आहे.