वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला शनिवार (दि. २२) पासून सुरुवात होत आहे. या निमित्त सालाबादप्रमाणे तीन दिवस मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वीरशैव सामाजाचे श्रद्धास्थान असलेल्या महात्मा बसवेश्वरांचे जेवळी येथे पुरातन मंदिर आहे. अनेक वर्षापासून येथे परंपरेने महात्मा बसवेश्वरांची जयंती ही अक्षयतृतीयेपासून तीन दिवस यात्रेच्या स्वरुपात साजरी केली जाते. ही यात्रा यावर्षी शनिवार (दि. २२) ते सोमवार (दि.२४) या कालावधीत पार पडत आहे. या परिसरात ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते. यावेळी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. शनिवारी (दि. २२) बसवेश्वरांच्या जयंतीदिनी पहाटे पाच वाजता बसवेश्वर मंदिरातील शिवलिंगास महाभिषेकानी या यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी आठ वाजता सालाबादप्रमाणे १०१ बैलजोड्याची गावातून सवाद्य मिरवणुक काढण्यात येते. या नंतर मंदिरासमोरील मैदानावर जिल्हास्तरीय पशु प्रदर्शन व उत्कृष्ट पशुधनास बक्षिसांचे वाटप केले जाते. सायंकाळी चार वाजता महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर प्रवचन, तर रात्री दहा वाजता मंदिरासमोरील मैदानावर अक्षता सोहळा व नंदी कट्ट्यांवर अग्नीप्रज्वलन कार्यक्रम पार पडते.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. २३) सकाळी आठ वाजता नंदीध्वज आणि बसवेश्वरांच्या पालकीसह गावातील मुख्य रस्त्यावरुन विविध कलापथक, सवाद्य मिरवणुक, अकरा वाजता नंदिकोलासह अग्नीस्पर्श तर रात्री नऊ वाजता सजविलेल्या नंदी ध्वज, विविध चित्ररथासह छबिना मिरवणुक निघेल. रात्री अकरा वाजता शोभेचे दारु काम मंदिरा समोरील मैदानावर पार पडणार आहे.
यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (दि.२४) अकरा वाजता भारुडाची जुगलबंदी, दुपारी चार वाजता कुस्त्यांची दंगल पार पडणार आहे. या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष बसवराज कारभारी व सचिव मल्लिनाथ डिग्गे यांनी केले आहे.