ज्यांनी लंडनमध्ये जाऊन प्राच्यविद्येत पीएच.डी. मिळवली. तेथेच बॅरिस्टर झाले व मायभूमीत येऊन कृषी, शैक्षणिक, सामाजिक परिवर्तन, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात धोरणात्मक कार्य केले. अशा जागतिक कीर्तीच्या डॉ.पंजाबराव देशमुख यांच्याबाबत बहुतांश महाराष्ट्रीयन मात्र अनभिज्ञ असावेत, ही बाब अत्यंत दुःखदायक आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी कदम देशमुख या घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामरावबापू तर आईचे नाव राधामाई होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच म्हणजे पापळ येथे तर माध्यमिक शिक्षण कारंजा लाड आणि अमरावती येथे झाले. लहानपणापासून त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. बालपणापासून शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रचंड पगडा त्यांच्या मनावर होता. त्यामुळे अध्ययनाची चिकाटी त्यांनी सोडली नाही. त्यांचे उच्च शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. पुढे ते उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. आपल्या मुलाने खूप शिकावे, ही त्यांच्या आईवडिलांची खूप ईच्छा होती.
डॉ. पंजाबराव देशमुख हे जिद्दी, महत्वकांक्षी होते. बालवयामध्ये त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शिक्षणविषयक विचार ऐकले होते. ते पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. लंडन येथील केंब्रिज विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. तेथे त्यांनी *”वेदवाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास”* या विषयावरती पीएच.डी. मिळविली. ते नामवंत प्राच्यविद्याविद ( Indologist) आहेत. त्याच वेळेस तेथील लिंकन इन या कॉलेजमध्ये बॅरिस्टरचे शिक्षण पूर्ण केले. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. तसेच त्यांचे हिंदी उत्तम होते. परदेशातील विद्यापीठात वेदावरती पीएच.डी. मिळवणारा पहिला भारतीय विद्वान म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख आहेत.
लंडन येथील शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतल्यानंतर जुलै 1925 पासून आपल्या सामाजिक कार्याला डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सुरुवात केली. प्रथम त्यांनी श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केली. गोरगरीब मुला-मुलींना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांची खूप तळमळ होती. मराठा हायस्कूलमध्ये त्यांनी अध्यापनाचे काम केले. ते हाडाचे शिक्षक देखील होते. मुलांचे शरीर तंदुरुस्त राहावे यासाठी त्यांनी व्यायाम शाळेची स्थापना केली. पुढे त्यांनी विदर्भातील सर्वात मोठ्या अशा श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. या संस्थेतून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन जगभरातील विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
गोरगरिबांना मोफत शिक्षण मिळावे, भाऊसाहेबांनी शिक्षण करात 18 पैसे वरून 27 पैसे अशी वाढ केली. भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता, यावे यासाठी त्यांनी लंडन येथे “छत्रपती शिवाजी एज्युकेशन ट्रस्टची” ची स्थापना केली. कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज आणि हैदराबादचा निजाम यांच्या मदतीने त्यांनी विदर्भामध्ये शैक्षणिक क्षेत्रात वाढ केली. अमरावती येथे झालेल्या 26 व्या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेत त्यांनी शिक्षणविषयक सडेतोड आणि क्रांतीकारक विचार मांडले. ते महान शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ होते.
डॉ. पंजाबराव देशमुख हे प्रागतिक विचारांचे होते. अस्पृश्यता, वर्णव्यवस्था त्यांना मान्य नव्हती. मोर्शी या ठिकाणी झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात त्यांनी वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला केला. मुळातच ते संस्कृत भाषेचे विद्वान होते. ते वेदवाङ्मयाचे अभ्यासक होते. त्यामुळे ते प्रमाणाशिवाय बोलत नसत. अमरावतीचे अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करावे, यासाठी त्यांनी चळवळ उभारली व संघर्ष केला. विश्वस्तांना विश्वासात घेऊन समतेचे महत्त्व पटवून दिले. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सोनार समाजातील विमल वैद्य यांच्याशी विवाह केला. ते जातीभेदाच्या विरुद्ध होते. डॉ. पंजाबराव देशमुख हे केवळ बोलके नव्हे, तर कर्ते सुधारक होते.
डॉ. पंजाबराव देशमुख हे अमरावती कौन्सिलचे अध्यक्ष होते. सर माँटेग्यू बटलर मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्री होते. मध्यप्रदेश प्रांतिक मंडळावर ते सदस्य होते. देवास संस्थानात ते मंत्री होते. अमरावती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. नागपूर विद्यापीठाचे ते सदस्य होते. त्यांनी अखिल भारतीय अविकसित समाज घटक या संस्थेची स्थापना केली. आंतरराष्ट्रीय ग्रामीण युवक परिषदेचे ते अध्यक्ष होते. कैरो येथे झालेल्या परिषदेसाठी ते भारताचे प्रतिनिधी होते.
डॉ. पंजाबराव देशमुख हे नामवंत कायदेपंडित होते. ते लंडन येथील बॅरिस्टर होते. मायदेशी आल्यानंतर त्यांनी देशाचे दुश्मन हा खटला देखील चालविला. पुढे त्यांनी आजाद हिंद फौजेचा देखील खटला चालविला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी खूप मोलाचे योगदान दिले. ते महान राष्ट्रभक्त होते, पण त्यांची राष्ट्रभक्ती प्रागतिक विचारांची होती. जातीभेद नष्ट झाला पाहिजे, आपल्या देशातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी, महिला, उपेक्षित वर्ग यांचा विकास म्हणजेच राष्ट्रीय विकास हा त्यांचा राष्ट्रवाद होता. त्यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी अत्यंत मैत्रीचे संबंध होते.
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भारतीय कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आहे. ते स्वतंत्र भारताचे नेहरू मंत्रिमंडळातील पहिले कृषिमंत्री आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी वऱ्हाड शेतकरी संघाची स्थापना केली. शेतीला जोड धंदा असल्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही हा पंजाबराव देशमुख यांचा विचार होता. त्यासाठी त्यांनी अखिल भारतीय मधुमक्षिका पालन संघटनेची स्थापना केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय धान्य मंडळाची स्थापना केली. राष्ट्रीय स्तरावरती शेतकऱ्यांचे संघटन असावे, यासाठी त्यांनी अखिल भारतीय कृषक समाजाची स्थापना केली. तरुणांना शेतीच्या क्षेत्रात दिशादर्शक शेतकरी हिताचे काम करता यावे यासाठी त्यांनी तरुण कृषक संघटनेची स्थापना केली.
डॉ. पंजाबराव देशमुख हे आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषदेचे अध्यक्ष होते. भारतीय कृषी यंत्रसामुग्री या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. अखिल भारतीय ताड गूळ महासभा या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. ते राष्ट्रीय कृषी विषयक सहकार खरेदी-विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी भारतीय कृषक सहकार अधिकोषाची स्थापना केली. भारतीय कृषी क्षेत्रात आधुनिकिकरण करण्यासाठी त्यांनी भारतीय कृषीशास्त्र परिषदेची स्थापना केली. शेतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी जपान, रशिया, न्युझीलँड इत्यादी देशांना भेटी दिल्या. त्यांनी 1960 साली दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
डॉ.पंजाबराव देशमुख यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे. भारतीय कृषी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात त्यांनी क्रांतिकारक कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन नागपूर विद्यापीठाने त्यांना एल.एल.डी. ही पदवी प्रदान केली. अशा महान कर्तृत्ववान, विद्वान महामानावाचा 10 एप्रिल1965 रोजी मृत्यू झाला. आज त्यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
– डॉ.श्रीमंत कोकाटे