जळगाव :
ऊर्जा निर्मितीच्या अपारंपरिक स्रोतांच्या वापरामध्ये सौरऊजेचा वापर पुढे येत असताना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेने माझी वसुंधरा अंतर्गत बहूपयोगी ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा बचतीचा महत्वाकांशी प्रकल्प राबवला आहे. ज्याचे नाव आहे पॉवर स्टेप.
नगरपरिषद कार्यालयात बरेच नागरिक कामासाठी येत असतात. नागरिक ज्यावेळी कार्यालयातील प्रवेशव्दारावरील मॅटवर पाय ठेवतात, त्यावेळी येथे असलेली “पॉवर स्टेप” प्रणाली कार्यन्वित होते.
“पॉवर स्टेप” मधील शक्तीशाली चुंबकामध्ये हालचाल निर्माण होऊन आतील कॉपर कॉईल मध्ये “ईएमएफ़” अथवा व्होल्टेज तयार होते. एका पावलाने ४८ V स्पाईक तयार होते. अशी अनेक पाउले पडल्याने मोठ्या प्रमाणात व्होल्टेज तयार होते. या प्रणालीत तयार झालेली ऊर्जा एका बॅटरीमध्ये साठवली जाते. नगरपरिषदेकडून लावण्यात आलेल्या उपकरणात ९ A बॅटरी व दोन ९ w बॅटरीचे एलईडी बल्ब लावण्यात आलेले आहे. ९ A बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे २००० पाऊले लागतात. कार्यालयात अंदाजे २०० नागरिक आणि १०० कर्मचाऱ्यांची दिवसभरात ये-जा होत असते. यामुळे २००० पाऊले सहजासहजी पूर्ण होतात. कार्यालयीन वेळ १० ते ६ दरम्यान नागरिकांच्या येण्या जाण्याने कोणत्याही विजेच्या वापराशिवाय बॅटरी चार्ज होईल. एकदा चार्ज झालेली बॅटरी रात्रीच्या वेळी कार्यालयातील गेट वरील दोन बल्ब प्रकाशित करण्यासाठी उपयोगात येईल. ९ A बॅटरीने दोन दिवे साधारणत: ६ ते ७ तास चालु राहतील. हा झाला ऊर्जा निर्मितीचा प्रकार.
विजेशिवाय चार्ज झालेल्या बॅटरीचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी बल्बची जोडणी PIR मोशन सेंसरला करण्यात आलेली आहे. ज्यावेळी एखादी चल वस्तु या सेंसरच्या क्षेत्रात आल्यास बल्ब ॲटोमटीक चालु होतील आणि हालचाल बंद झाल्यानंतर ५ मिनिटात बल्ब बंद होईल. हे आहे ऊर्जा बचतीचे मॉडेल.
सकारात्मक परिणाम
पॉवर स्टेपच्या वापरामळे दोन बल्ब जळतील एवढी ऊर्जा निर्मिती होत आहे. नागरिकांपर्यंत अशा प्रणालीचा वापर तसेच ऊर्जा बचतीचा संदेश पोहचत आहे. अशा प्रकाराचे उपकरण शहरातील लोकांच्या वर्दळीच्या ठिकाणी लावण्याबाबत अमळनेर नगरपरिषद आग्रही आहे. पॉवर स्टेप २३ मार्च २०२२ ला कार्यान्वित करण्यात आलेला आहे. प्रवेशव्दाराजवळील दोन बल्ब जळण्यासाठी महिन्याकाठी सात विद्युत युनिट लागतात. आतापर्यंत १०० युनिट ऊर्जा या उपकरणाने बनवली आहे. याच उपकरणात आवश्यक बदल करून इन्व्हर्टर युनिटची बॅटरी चार्ज करण्याचे काम सुरु आहे.