वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क (उमरगा प्रतिनिधी)
उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना संचलित क्युनर्जी इंडस्ट्रीज कारखान्याचे इथेनॉल आणि वीजनिर्मिती युनिटचे भूमिपूजन रविवारी (दि.२०) विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन सुरेश बिराजदार व क्युनर्जीचे संचालक सचिन सिनगारे यांची यावेळी उपस्थिती होती.
विरोधी पक्षनेते अजितदादा पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता युनिटचे भूमिपूजन कारखान्याचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार, क्युनर्जीचे संचालक सचिन सिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार यांनी साखर कारखान्याच्या कामकाजाची पाहणी करून क्षमता वाढीच्या कामकाजाचा आढावा घेतला. भाऊसाहेब बिराजदार कारखाना क्युनर्जी इंडस्ट्रीजला भाडेतत्त्वावर दिल्यानंतर अल्पावधीतच साखर कारखान्याने प्रगती साधत कारखान्याची गाळप क्षमता तर वाढवलीच त्यासोबत परिसरातील साखर कारखान्यांपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव दिला. काही दिवसांपूर्वी उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गाळप क्षमता वाढवण्यासह इथेनॉल निर्मिती व वीजनिर्मिती युनिट उभारण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे महिनाभरातच इथेनॉल व वीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
🔴 शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त भाव देणे शक्य
हा प्रकल्प उभारल्याने पूर्वी दिलेल्या सर्वाधिक भावापेक्षा आणखीन जास्त भाव शेतकऱ्यांना मिळेल व परिसरातील उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासह बेरोजगारांनाही कामाची संधी उपलब्ध होईल. यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्न करत असल्याची माहिती चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांनी दिली. यावेळी साखर कारखान्याचे प्रभारी जनरल मॅनेजर बी. जे. पाटील, चीफ केमिस्ट एस.बी. पांढरे, चीफ इंजिनियर ए. एम. कोळगे, शेतकी अधिकारी एस. एस. त्रिगुळे यासह शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.