वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील एका ६० वर्षीय पुरुषाचा सोमवारी ( दि. १२) मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे तालुक्यातील मृत्यू झालेली संख्या ३१ वर पोहोचली आहे.
तालुक्यातील सास्तुर येथील एका ६० वर्षीय पुरुषाची रॅपिड अँटीजन टेस्ट ७ एप्रिल ला पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांच्यावर तुळजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना पूर्वीचे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आजार होते. उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी ( दि.१२) मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे तालुक्यातील मृत्यू झालेली संख्या ३१ वर पोहोचली आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी दिली आहे.
तालुक्यातील ३१ मृत्यू पैकी २४ जणांना काही तरी पूर्वीचा दुर्धर आजार होता. तसेच ३१ पैकी २६ जण हे ६० वर्ष किंवा त्यापूढे वयाचे होते. लस घेतल्याने मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे आणि मृत्यूचा सर्वाधिक धोका हा दुर्धर आजार असणाऱ्या तसेच नागरिकांना आहे. त्यामुळे दुर्धर आजार असणाऱ्या व जेष्ठ नागरिकांनी आवर्जून लस घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सोमवारी आढळले ४८ रुग्ण
सोमवारी (दि.१२) प्राप्त अहवालानुसार तालुक्यात एकूण ४८ रुग्ण आढळले आहेत. यापैकी रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये २७ तर आरटीपीसीआर चाचणी मध्ये २१ रुग्ण आढळले आहेत. आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णापैकी ११ रुग्ण हे फक्त जेवळी येथील आहेत. तर रॅपिड अँटीजन टेस्ट मधील २७ रुग्णापैकी १६ रुग्ण हे माकणी येथील आहेत.