वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
माकणी येथील आरोग्य केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, आरोग्य केंद्र डागडुजी, ऑक्सिजन सिलेंडर, आदी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या माकणी अध्यक्षा ऐश्वर्या साठे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, माकणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खिडक्या, दरवाजे तुटलेले आहेत. त्यामुळे संसर्गजन्य आजाराला पेशंट, नागरिक बळी पडत आहेत. मच्छर वाढलेले आहेत, शिवाय सॅनिटायझरची मशीन आहे पण त्यात सॅनिटायझर नाही. वजन काट्याची मशीन बिघडलेली आहे. आरोग्य केंद्रातील टॉयलेटची अवस्था वाईट आहे. ऑक्सिजन सिलेंडर तर नाहीच. बेडची कमतरता आहे.
बसण्यासाठी बेंच नसल्याने अनेक पेशंट जमिनीवर बसून लस, उपचार घेत आहेत. माकणी भागात आलेल्या पेशंटला लोहारा, सास्तुर या ठिकाणी हलवले जाते. इमर्जन्सी एखादा पेशंट आला तर त्याला ऑक्सिजन बेड नाहीत अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे आरोग्य केंद्राची स्वच्छता करावी, संसर्गजन्य रोगराई होऊ नये यासाठी फवारणी करावी, पेशंटच्या नातेवाईकांना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था करावी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्वच खिडक्या तुटलेले आहेत त्या दुरुस्ती कराव्या, टॉयलेटचा दरवाजा तुटलेला आहे, टॉयलेट ब्लॉक झाले आहे, वजन काट्याची मशीन पूर्णपणे बिघडलेली आहे ती दुरुस्त व्हावी, प्राथमिक आरोग्य केंद्रात वापरलेले मास्क, ड्रेसिंग, ग्लोज उघड्यावर फेकले गेलेले आहेत त्यावर उपाययोजना करण्यात यावी आदी मागण्या ऐश्वर्या साठे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात केल्या आहेत.