वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील होळी येथील युवा शेतकरी चंद्रहर्ष जाधव हे पुणे येथील अरीहंत कॉलेज ऑफ़ आर्ट, सायन्स अॅण्ड कॉमर्स या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असुन सध्या लॉकडाऊनमुळे ते आपल्या गावी वडिलांना मदत म्हणून शेती करीत आहेत. परंतु पारंपरिक पद्धतीने शेती न करता काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यांनी पाच गुंठे जमीनीवर झेंडूच्या पिवळ्या व भगव्या रंगाच्या फुलांची शेती केली. भारतीय संस्कृतीमध्ये दसरा आणि दिवाळी या सणामध्ये झेंडूच्या फुलांना खुप महत्व आहे. त्यामुळे या सणासुदीच्या काळात फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.परंतू सोलापूर, लातुर, उमरगा अशा बाजारपेठेत फुले नेऊन विक्री करण्यासाठी लागणारा वाहतुक खर्च, बाजारपेठेत मिळणारा कमी भाव शेतकऱ्यांना पेलवत नाही. म्हणून थेट ग्राहकांना एका क्लिकवर माल जागेवर उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी त्यांचे मित्र आय. टी. इंजिनियर कृष्णा सरवदे यांच्या मदतीने ऑनलाईन लिंक तयार करुन सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप्प आणि फेसबुकवर आपल्या व्यवसायाची जाहिरात केली व शेताच्या बांधावरून थेट ग्राहकांच्या दारापर्यंत फुले कसे पोहचवता येईल यासाठी प्रयत्न केले. सध्याच्या डिजिटल युगामध्ये एका क्लिक वर घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्या झपाट्याने मोठ्या होत आहेत. काळाला अनुसरून शेतकरी सुद्धा मागे रहायला नको असा विचार केला व या उपक्रमाला ग्राहकांचा आफाट प्रतिसादही लाभला व भावही चांगला लागल्यामुळे व कमी खर्चात कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळाल्याने चांगला नफा मिळाला. या अभिनव उपक्रमामुळे परिसरातील शेतकरी त्यांचे अभिनंदन करीत असुन युवा शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.