मुंबई :
‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त १२ मार्च २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत देशभरात विविध उपक्रम घेण्यात यावे असे निश्चित करण्यात आले होते. तसेच आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती खास अमृतमहोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर भरणे आवश्यक होते. त्यामध्ये आयोजित उपक्रमांची संख्या व त्याची माहिती संकेतस्थळावर भरण्यात संपूर्ण देशात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. देशात झालेल्या उपक्रमपैकी तब्बल ७५ टक्के उपक्रम एकट्या महाराष्ट्रात राबवण्यात आले आहेत.
तसेच राज्यात पुणे जिल्ह्याने अग्रस्थान मिळविले आहे.
त्यामध्ये संपूर्ण भारतातून ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व राज्य या चारही स्तरांवर सर्वात जास्त ४ लाख ४ हजार २८२ इतक्या उपक्रमांचे आयोजन व संकेतस्थळावर माहिती भरून महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्या खालोखाल झारखंड ४८ हजार ७०४ व गुजरात ४२ हजार ३९६ उपक्रम अंमलबजावणीसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे दुसऱ्या स्थानावरील झारखंड पेक्षा तब्बल आठ पट अधिक उपक्रम महाराष्ट्राने राबवले आहेत.
राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर
या संकेतस्थळावर लाख १ हजार ९३५ उपक्रमांची माहिती भरत पुणे जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच त्याखालोखाल नगर जिल्ह्याने दुसरा तर गडचिरोलीने तिसरा क्रमांक मिळवला आहे. ग्रामपंचायत स्तरावर राज्यात सर्वाधिक १ लाख हजार २९२ उपक्रमांची माहिती पुणे जिल्ह्याने भरली आहे. जिल्ह्यातील १ हजार ३८५ ग्रामपंचायत मध्ये या अभियानाअंतर्गत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले.