वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार रुजू करावे तसेच संजय गांधी निराधार व पुरवठा विभागातील पदे भरण्यात यावे या मागणीसाठी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुधवारी (दि.२७) तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यापासून तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार नसल्यामुळे नागरिकांचे अनेक कामे खोळंबली आहेत. संजय गांधी निराधार तसेच श्रावण बाळ योजनेतील अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत तर पुरवठा विभागातील नागरिकांच्या कामाचे निरसन केले जात नाही. तहसीलदार नसल्याने वेळेत कामे होत नाहीत. तसेच लोहारा तहसील कार्यालयामध्ये एक नायब तहसीलदार रजेवर आहेत, तर दुसरे नायब तहसिलदार प्रतिनियुक्तीवर आहेत.
लोहारा तहसील कार्यालयात तात्काळ कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करावे तसेच संजय गांधी निराधार व पुरवठा विभागात तात्काळ पदे भरण्यात यावेत अन्यथा १५ फेब्रुवारी रोजी लोहारा तहसील कार्यालयाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने टाळे ठोकण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, शरद पवार, महादेव मगर, किरण सोनकांबळे, प्रणिल सूर्यवंशी, अंगद मुळे, महादेव पवार, रामेश्वर सूर्यवंशी, वजीर शेख, आबासाहेब पवार, अमोल बिराजदार, संजय खरोसे, राहुल सुरवसे, नयन बिराजदार, रवींद्र जाधव सह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.