वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मुरूम महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानातून वगळल्याने रविवारी (दि.२५) बसव प्रतिष्ठान च्या वतीने मुरूम मोड येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुरूम महसुल मंडळातील १७ गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीतुन वगळल्यामुळे दि. १५ सप्टेंबर रोजी बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉ.रामलिंग पुराणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन मुरूम महसूल मंडळ अतिवृष्टीत समाविष्ट करण्याची मागणी केली होती. अन्यथा दि. २५ सप्टेंबर रोजी मुरूम मोड येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आले होते. या निवेदनाची शासन दरबारी कोणतीच दखल न झाल्याने रविवारी दि.२५ सप्टेंबर २०२२ रोजी मुरूम मोड वरील राष्ट्रीय महामार्गावर मोर्चा काढून रास्तारोको आंदोलन करून दोन्ही मार्ग चक्का जाम करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत मुरूम महसूल मंडळात अतिवृष्टी समावेश करून न्याय देण्याची घोषणा केली. यावेळी डॉ. पुराणे म्हणाले, मुरूम महसूल मंडळावर जाणून बुजून वारंवार अन्याय केला जात आहे. लोकप्रतिनिधीनी वेळेत दखल घेऊन जनसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा हेच जनसामान्य शेतकरी मतपेटीतून तुमचा पाय उतार करेल आणि कंबरड्यावर लात घालून हाकलून देईल, प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून मुरूम महसूल मंडळास अतिवृष्टीत समावेश करा व त्याच बरोबर मुरूम महसूल मंडळात योग्य ठिकाणी पर्जन्यमान यंत्र बसवण्याची मागणी केली. यावेळी शेतकरी गोविंद पाटील, मोहन जाधव, युवासेना तालुका प्रमुख अजित चौधरी आदींनी आक्रोश मनोगत व्यक्त केले. मुरूम महसूल मंडळातील मुरूम, अंबरनगर, आचार्य तांडा, फुलसिंगनगर, गणेश नगर, नाईकनगर, इंगोले तांडा, तुगाव, सुंदरवाडी, नाईकनगर सु, बेळंब, कंटेकुर, कोथळी, मुरळी, आलूर, वरणाळवाडी, केसर जवळगा या गावातील शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी होते.
बसव प्रतिष्ठाणने पुकारलेल्या या आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील, उमरगा तालुका युवासेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुरूम शेतकरी संघटना, तुगाव ग्रामपंचायत आदींनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी केसरजवळगा शेतकरी श्रीमंत भुरे, आलूरचे राजू बिराडे, वरणाळचे माजी सैनिक मरबे, मुरूमचे माजी सैनिक व्यंकटराव चौधरी मुरूम न.प.चे माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, सुनील मुळे, अमित बिराजदार,संजय मुळे, संतोष दादा कलशेट्टी,अभिजित घाळे, अजीम शेख, श्रीधर इंगळे,माजी पंचायत समिती सदस्य गिरीष बिराजदार, आदीसह मुरूम महसूल मंडळातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
———–
मुरूम महसूल मंडळावरील जाणून बुजून होणारे अन्याय तात्काळ थांबवा, अन्यथा लोकप्रतिनिधीना भविष्यात फार मोठी किंमत मोजावी लागेल. मुरूम महसूल मंडळ अतिवृष्टीत समाविष्ट नाही झाल्यास यापुढे आणखीन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आता आंदोलन मंत्रालयासमोर राहील याची नोंद घ्यावी….
डॉ. रामलिंग पुराणे
समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठाण