वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आघाडी सरकारने शिवजयंती साजरी करताना मिरवणुका न काढणे प्रबोधनात्मक कार्यक्रम न घेणे बाबत जो निर्णय घेतला आहे तो या महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा आहे. हा निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावे अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटतील असे निवेदन लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना सकल शिवप्रेमी यांच्या वतीने शुक्रवारी (दि.१२) देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मागच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आपल्या प्रत्येक आव्हानाला महाराष्ट्रातील जनतेने अगदी मनापासून प्रतिसाद दिलेला आहे. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेत आपला आनंद उत्सव हा साधेपणाने व आपल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत साजरा केले. सन २०२० हे तमाम जनतेसाठी वेदनादायक ठरले. वर्ष २०२१ हे जगभरातील तमाम मानव जातीसाठी आशादायी किरणांनी उजळले असे असताना मागच्या वर्षी महाराष्ट्राने कोरोना सोबतच अतिवृष्टीच्या संकटाचा देखील सामना केला. या संकट काळात आपल्या उत्कृष्ट दिलासादायक संवादाने व काळजीवाहू नेतृत्व गुणाने आपण जनतेच्या मनातील आवडते मुख्यमंत्री देखील ठरलात.
सध्या गावोगावी धर्माच्या, देवाच्या नावाखाली कीर्तने होतात, राजकीय कार्यक्रम होतात मग शिवजयंती साठी बंधन का ? यासाठी आपले निर्णय तात्काळ मागे घ्यावे अन्यथा दि. १६ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय पदयात्रा काढून निषेध व्यक्त करीत समग्र शिवप्रेमी आक्रमकपणे रस्त्यावर उतरतील अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, युवा सेना उपजिल्हाप्रमुख तथा कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक दत्ता मोरे, अखिल भारतीय छावा संघटना युवक जिल्हाध्यक्ष कालिदास गायकवाड, कृष्णा जाधव, अथर्व जावळे पाटील, आप्पा साहेब जावळे पाटील, भरत कदम, बालाजी यादव, अविनाश मुळे, तानाजी पाटील, अभिजीत सूर्यवंशी, महेश गोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रतिभा परसे, सुनीता कदम, गोकर्णा कदम यांच्यासह अनेक शिवप्रेमीच्या स्वाक्षऱ्या आहेत.