वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) पुरस्कृत नवप्रभा महिला प्रभागसंघ जेवळी व स्टेट बँक ऑफ इंडिया पुरस्कृत भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था कौशल्य विकास मार्गदर्शन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवप्रभा महिला प्रभागसंघ जेवळी कार्यालय येथे महिलांसाठी दि. ६ ते दि. १५ मार्च दरम्यान दहा दिवसीय शेळी पालन प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.
नवप्रभा महिला प्रभागसंघ जेवळी अंतर्गत अचलेर, आष्टाकासार, दस्तापूर, भोसगा, दक्षीण जेवळी, रुद्रवाडी, फनेपुर, उत्तर जेवळी या एकूण आठ गावांचा समावेश आहे. या ८ गावामध्ये जागतिक बँक पुरस्कृत एनआरईटीपी प्रकल्पांतर्गत एकूण चार शेळी उत्पादक संघ आर्थिक वर्ष २०२० – २१ मध्ये स्थापन करण्यात आले आहे. सदरील उत्पादक संघातील ३५ महिलांना आधुनिक व सोप्या पद्धतीने शेळीचे पालन पोषण व संगोपन करता यावे या उद्देशाने उमेद व भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत अनेक तज्ञ व प्रशिक्षित डॉक्टर यांच्या मार्फत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये महिलांना बंदिस्त शेळीपालन, तसेच विविध जातीच्या शेळीपालन विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दिनांक १३ मार्च रोजी शेळीपालन प्रशिक्षणाची अभ्यास सहल तावशीगड येथील रश गोट फॉर्म येथे भेट देऊन शेळी पालन व्यवसायाबदल माहिती देण्यात आली. महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत दि. ८ मार्च जागतिक महिला दिन ते ५ जून जागतिक पर्यावरण दिना पर्यंत विविध उपक्रम राबविणे बाबत शासनाकडून सूचना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने महिलामध्ये उद्योजकता विकास व्हावा या करिता महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे प्रणिता कटकदौंड यांनी सांगितले. तसेच या प्रशिक्षणा मधून महिलांनी उपजीविकेचे स्तोत्र वाढविण्यासाठी प्रशिक्षणाची मदत होणार आहे. सदरील प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड, प्रभाग समन्वयक अविनाश चव्हाण, भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था प्रशिक्षक विकास गोफणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.