वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेसाठी येणारा अवाढव्य खर्च कमी करावा या हेतूने रिलायन्स पेट्रोलियम कंपनीद्वारे मोफत इंधन सेवा सुरू करण्यात आली असून उस्मानाबाद जिल्ह्यातील या उपक्रमाचा मंगळवारी (दि.१८) रिलायन्स पेट्रोलपंप, उमरगा येथून शुभारंभ करण्यात आला.
सध्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत अनेक गरजू रुग्णांना रुग्णवाहिकेची आवश्यकता भासल्यास त्यांना बेमाप पैसे मोजावे लागत आहेत. नेमकी रुग्णांची ही गरज ओळखुन रिलायन्स पेट्रोलियमद्वारे कोरोनाग्रस्त रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना, मग ती शासकीय असो किंवा खाजगी दररोज 50 लिटर याप्रमाणे मोफत इंधन देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. सुरुवातीला सदर उपक्रम हा केवळ मोठ्या शहरात राबविण्यात येत होता. परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही वाढत असल्याने व खरी गरज ग्रामीण भागातील रुग्णांना असल्याने महाराष्ट्र शासनाच्या विनंतीस मान देऊन रिलायन्स पेट्रोलियम समूहाद्वारे ग्रामीण भागातही हा उपक्रम राबवण्याचे मान्य केले आहे.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांना आपल्या आमदार निधीतून मंजूर असलेल्या कार्डियाक रुग्णवाहिका लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालयाकडे सुपूर्द करण्याच्या सूचना आमदार ज्ञानराज चौगुले यांना केल्या. खाजगी रुग्णवाहिकांनाही मोफत इंधन मिळत असल्यामुळे गरजू रुग्णांकडून माफक दर घ्यावेत असे आवाहन खाजगी रुग्णवाहिका चालकांना करून सदरचा उपक्रम सुरू केल्याबद्दल रिलायन्स समूहाचे मान्यवरांनी आभार मानले.
यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, उमरगा रिलायन्स पेट्रोलपंपाचे संचालक विक्रम माणिकवार, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे समन्वयक रमाकांत जोशी, डॉ. वसंत बाबरे, 108 रुग्णवाहिका समन्वयक जयराम शिंदे, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, योगेश तपसाळे, शरद पवार, राघवेंद्र माणिकवार, शाहूराज माने, पेट्रोलपंप व्यवस्थापक सिद्धेश्वर मुर्गे आदी उपस्थित होते.