वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
करोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहीत आहेत. 2003 मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा 2012 मध्ये आढळलेला मर्स हा आजार हे सुद्धा करोना विषाणूंमुळे होणारे आजार आहेत. परंतु डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या या उद्रेकामध्ये जो करोना विषाणू आढळला तो यापूर्वीच्या करोना विषाणू पेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला नॉवेल अर्थात नवीन करोना विषाणू असे संबोधण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास कोविड-19 असे नाव दिले आहे.
करोनाचे मूळ स्थान:-
करोना हा विषाणू प्राणी जगतातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळामध्ये आढळतो. बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणांमुळे प्राणी जगतातील सूक्ष्म जीव मानवामध्ये प्रवेश करतात.
करोना विषाणू आजाराची लक्षणे:-
ही मुख्यत्वे श्वसन संस्थेशी निगडित असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, न्युमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.
करोना विषाणूमुळे होणारा आजार पसरतो कसा?
हा आजार शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात,त्यातून पसरतो. याशिवाय खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर पडतात, अशा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने हे थेंब हाताला चिकटतात. हाताने वारंवार चेहरा, डोळे, नाक चोळण्याच्या सवयीमुळेदेखील हा आजार पसरू शकतो.
सुरूवातीस करोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नव्हती रुग्णास त्याच्या लक्षणांनुसार उपचार केले जात हाेते.मात्र आता लस उपलब्ध झाली आहे.
करोना आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी :-
करोना किंवा श्वसनावाटे पसरणाऱ्या स्वाइन फ्लू, क्षयरोग असे आजार टाळण्यासाठी खालील खबरदारी घेणे आरोग्यासाठी हिताचे आहे.
• श्वसन संस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे.
• हात वारंवार धुणे.
• खोकताना नाका-तोंडावर रुमाल अथवा टिशू पेपर धरणे.
• अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये.
• फळे,भाज्या न धुता खाऊ नयेत.
खाली नमूद केलेल्या व्यक्तीने ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा:-
• ताप, खोकला व श्वसनास त्रास होणाऱ्या व्यक्ती.
• हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे, हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने करोना बाधित देशात प्रवास केला असल्यास.
• प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केला आहे.
नवीन करोना विषाणू उपाययोजना:-
करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात पुढील उपाययोजना राबविण्यात येत आहेत-
• आंतरराष्ट्रीय विमानतळ व बंदरावर प्रवाशांचे स्क्रीनिंग.
• केंद्र सरकारच्या निर्देशानुसार करोना बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग मुंबई, पुणे, नागपूर या विमानतळावर व राज्यातील मोठ्या तसेच सर्व लहान बंदरांवर सुरू करण्यात आले आहे.
• या स्क्रीनिंगमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्यात येते.
• बाधित देशातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा- जे प्रवासी करोना बाधित देशातून भारतामध्ये येत आहेत,त्यांची माहिती दैनंदिन स्वरूपामध्ये विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत राज्य आरोग्य विभागास कळविली जाते.
• इतर बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील, तरच विलगीकरण कक्षात भरती करून त्यांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते.
• बाधित भागातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहेत.
• या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील 14 दिवस दूरध्वनीद्वारे दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते. याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळविणेबाबत प्रत्येक प्रवाशास सूचित करण्यात आले आहे.
• या दैनंदिन पाठपुराव्यामुळे एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन:-
सोशल मीडियावर करोना संदर्भात अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भीती उत्पन्न करणारे संदेश फिरताना दिसत आहेत. असे कोणतेही संदेश हे अधिकृत स्रोतांकडून खात्री करून घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत तसेच आवश्यक असल्यास नागरिकांनी हेल्पलाइनला फोन करून शंकानिरसन करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. चुकीचे मेसेज पसरविणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याविषयीचे निर्देशही देण्यात आले आहेत.
आपल्या मनातील प्रश्न:-
कोविड-19 म्हणजे काय? या आजाराची सुरुवात कशी झाली?
हा नुकताच शोध लागलेला करोना विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहानमध्ये या साथीची सुरुवात झाली असून या आजाराचा प्रसार सर्व उपखंडामध्ये होताना दिसून येत आहे.
हा आजार झाला आहे कसे ओळखावे?
या आजाराची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, सर्दी आणि कोरडा खोकला. काही रुग्णांना श्वसनास त्रास होणे, अंगदुखी, घसा खवखवणे किंवा अतिसार असू शकतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू त्याची सुरुवात होते. बहुतेक लोकांमध्ये (सुमारे 80 टक्के) हा आजार सौम्य प्रकारचा असतो तसेच विशेष उपचार न घेताच स्वतःच्या प्रतिकारशक्तीने या आजारापासून ते बरे होतात.
या आजाराची लागण कशी होते?
खोकला किंवा श्वास घेत असताना नाक किंवा तोंडातून लहान थेंबाद्वारे हे विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतात. हे लहान थेंब सभोवतालच्या वस्तू किंवा पृष्ठभागावर पडतात. त्यानंतर इतर लोकांनी अशा वस्तूंना किंवा पृष्ठभागास स्पर्श केल्यास त्यांच्या हातावाटे डोळे, नाक किंवा तोंडातून हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. संसर्ग असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास आपल्याला देखील हा आजार होऊ शकतो. म्हणून आजारी असलेल्या व्यक्तीपासून एक मीटर तीन फूट लांब राहणे महत्त्वाचे आहे.
एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसत नसतानाही या आजाराचा प्रसार होऊ शकतो का?
हा आजार पसरण्याचा मुख्य मार्ग म्हणजे श्वासोच्छ्वास (ज्या व्यक्तीला हा आजार आहे त्याच्या खोकल्यातून/शिंकण्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबातून हा आजार पसरला जातो). त्यामुळे मुळीच लक्षणे नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून हा आजार पसरण्याचा धोका खूप कमी आहे.
गंभीर आजार होण्याचा धोका कोणाला आहे?
वृध्द लोक आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह यासारखे दीर्घ मुदतीचे आजार असणाऱ्यांना गुंतागुंत होण्याची शक्यता असते. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असलेल्या लोकांनी तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत.
मी व माझ्या घरच्यांनी या विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यावी?
हा आजार सामान्यतः सौम्य असतो. विशेषतः मुली आणि तरुण,प्रौढांसाठी. तथापि हा विषाणू वृद्ध लोकांना, उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेही व्यक्तींमध्ये गंभीर आजारास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे या संसर्गाचा त्यांच्यावर आणि निकटवर्तीयांवर होणाऱ्या परिणामांविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःचे, निकटवर्तीयांचे व समाजाचे संरक्षण करण्यासाठी काही सवयी व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम मुख्य म्हणजे नियमित आणि स्वच्छ हात धुणे. आणि श्वसनासंबंधी आरोग्यदायी सवयींचा अवलंब करणे. दुसरे म्हणजे आजाराच्या माहितीविषयी जागरुक राहा तसेच स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सल्ल्याचे अनुकरण करा. (विशेषत: शाळा, महाविद्यालय, प्रवास, उत्सव, समारंभ, मेळावे) इत्यादी गर्दीविषयक देण्यात येणारे निर्देश.
स्वतःचे रक्षण करण्यासाठी मी मुखवटा (फेस मास्क) घालायचा का?
जर आपणास या आजाराची लक्षणे (विशेषत: खोकला) असतील किंवा संसर्ग झालेल्या आजारी व्यक्तीच्या संपर्कात आला तर मुखवटा फेस (मास्क) घालणे आवश्यक आहे. डिस्पोजेबल फेस मास्क फक्त एकदाच वापरला जाऊ शकतो. अन्यथा या मास्कची विल्हेवाट योग्य प्रकारे न केल्यास इतरांना धोका निर्माण होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटना लोकांना अनावश्यक मास्कचा वापर करू नये, असा सल्ला देत असून सर्वसामान्य नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी हातरुमालाचे तीन पदर करून त्याचा मुखवटा वापरावा, जो रोज योग्य प्रकारे धुतला जाऊ शकतो.
या आजाराचा अधिशयन कालावधी किती आहे?
“अधिशयन कालावधी” म्हणजे विषाणूचा शरीरामध्ये प्रवेश झाल्यापासून ते आजाराची लक्षणे दिसणेपर्यंतचा काळ. हा कालावधी आजपर्यंतच्या अभ्यासावरून साधारणपणे एक ते चौदा दिवसांचा असतो. तथा सर्वसाधारणपणे पाच दिवसांचाही असतो.
एखाद्या प्राण्याच्या माध्यमातून मनुष्यामध्ये हा विषाणू संक्रमित होऊ शकतो का?
करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव आहे. जे प्राण्यांमध्ये सामान्यतः आढळून येतात. कधी कधी लोकांना प्राण्यांचा अथवा त्यांच्या मांसाचा निकट संपर्क आल्यामुळे या विषाणूची लागण होते, जे नंतर संसर्गामुळे इतर लोकांमध्ये पोहोचू शकते.(उदाहरणार्थ सार्स आजार मांजरीशी संबंधित होता आणि मर्स आजार उंटाद्वारे प्रसारित झाल्याचे अनुमान आहे). याकरिता स्वतःचे रक्षण करण्याकरिता मांस विक्रीच्या बाजारात जाताना प्राणी आणि त्यांच्या मांसाच्या संपर्कात असलेल्या पृष्ठभागाशी थेट संपर्क टाळा. कच्चे मांस, दूध किंवा जनावरांच्या अवयवांना काळजीपूर्वक हाताळावे. कच्चे, अर्धवट शिजवलेल्या अन्नपदार्थांचे सेवन करणे टाळा.
वस्तूंवर, पृष्ठभागांवर विषाणू किती काळ टिकून राहतो?
या आजाराला कारणीभूत विषाणू पृष्ठभागावर किती काळ टिकतो हे निश्चित नाही. अभ्यासानुसार करोना विषाणू काही तास किंवा कित्येक दिवस पृष्ठभागावर चिकटून राहू शकतात. हे परिस्थितीनुसार भिन्न असू शकते. (उदाहरणार्थ, पृष्ठभागाचा प्रकार, वातावरणाचे तापमान आणि आर्द्रता). जर आपल्याला असे वाटत असेल की, एखादा पृष्ठभाग संक्रमित झाला आहे तर, विषाणू नष्ट करण्यासाठी आणि स्वतःचे व इतरांचे संरक्षण करण्यासाठी साध्या जंतुनाशकाने तो पृष्ठभाग साफ करा, आपले हात साबण आणि पाणी वापरून स्वच्छ धुवा,आपले डोळे, तोंड किंवा नाक यास वारंवार स्पर्श करणे टाळा.
हे करा…
• आपले हात वारंवार स्वच्छ धुवा.नियमितपणे साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा.
*का करावे?*
• नियमितपणे साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुतल्याने आपल्या हातावर असलेले विषाणू नष्ट होतात.
*निकट संपर्क टाळावा:-*
• स्वतःमध्ये आणि खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या व्यक्तीमध्ये कमीत कमी एक मीटर (तीन फूट)चे अंतर ठेवा.
*का करावे?*
• जेव्हा एखाद्या व्यक्तीला खोकला किंवा शिंक येते तेव्हा त्याच्या नाकातून किंवा तोंडातून लहान द्रव थेंबावाटे फेकले जातात,ज्यात विषाणू असू शकतो. जर तुम्ही त्या व्यक्तीच्या खूप जवळ असाल तर तो विषाणू तुमच्या देखील शरीरात प्रवेश करण्याची शक्यता असते.
डोळे,नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळावे.
*का करावे..?*
• आपल्या हाताद्वारे बऱ्याचशा वस्तू, फर्निचर,हँडल्स इ.ठिकाणी स्पर्श केला जातो.ज्यामुळे विषाणू संक्रमणाची शक्यता असते. एकदा दूषित झाल्यास आपल्या हातावाटे ते विषाणू डोळे,नाक किंवा तोंडात शिरकाव करतात. मग तेथून,विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करुन आपण आजारी पडू शकतो.
*हे करा…*
• शिंकताना,खोकताना या गोष्टींची सवय लावा-
• आपण आणि आपल्या सभोवतालच्या लोकांनी श्वसनासंबंधी आरोग्यदायी सवयींचा अवलंब करणे आवश्यक आहे.याचा अर्थ असा की, जेव्हा आपण खोकतो किंवा शिंकतो तेव्हा आपले तोंड किंवा नाक आपल्या हाताच्या तळव्यांनी किंवा टिश्यू पेपरने झाकावे.टिश्यू पेपरांची त्वरीत विल्हेवाट लावावी.
*का करावे?*
• लहान-लहान थेंबाद्वारे विषाणू पसरतात. श्वसनासंबंधी आरोग्यदायी सवयींचा अवलंब करुन आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सर्दी,फ्लू आणि कोविड-19 यासारख्या विषाणूंपासून वाचवतो.
जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वैद्यकीय मदत घ्या—
• जर आपल्या अस्वस्थत वाटत असल्यास घरी राहा. जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वैद्यकीय मदत घ्या आणि पूर्वसूचना म्हणून डॉक्टरांना संपर्क करा. या काळात आपल्या स्थानिक आरोग्य अधिकार्यांच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करा.
*का करावे?*
• कारण आपल्या भागातील परिस्थितीविषयी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांकडे अद्यावत माहिती असते. पूर्वसूचना म्हणून संपर्क केल्यास आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रांमध्ये त्वरित आपल्याला योग्य आरोग्य सुविधा मिळवून देता येईल. यामुळे आपले संरक्षण देखील होईल आणि जीवघेणे विषाणू आणि इतर संसर्गाचा फैलाव रोखण्यास मदत होईल.
*हे करू नका…*
• सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणे.
• तुम्हाला ताप व खोकला यासारखी लक्षणे असताना इतरांशी निकटचा संपर्क ठेवणे.
• प्राण्यांशी थेट संपर्क तसेच कच्चे, अर्धवट शिजलेले अन्न खाणे.
• कत्तलखाने व उघड्यावर मांस असणाऱ्या ठिकाणी जाणे.
*आरोग्य शिक्षण व संवाद:-*
• राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सर्वसामान्य जनता, वैद्यकीय व्यावसायिक आणि बाधित भागातून आलेल्या प्रवाशांसाठी आरोग्य शिक्षण विषयक साहित्य तयार करण्यात आले असून ते सर्व संबंधितांना वितरित करण्यात आले आहे.
*करोना विषाणू.. काळजी करू नका.. सावध राहा ! स्वतःच्या आणि इतरांच्या आजारी पडण्यापासून संरक्षण करा..*
•आपले हात स्वच्छ धुवा.
• खोकल्यावर अथवा शिकल्यानंतर
• एखाद्या आजारी व्यक्तीची काळजी घेताना
• स्वयंपाक करण्यापूर्वी, तयार करताना आणि तयार केल्यानंतर.
• जेवणापूर्वी
• शौचानंतर
• प्राण्यांचा सांभाळ केल्यानंतर
• आणि प्राण्यांची विष्ठा काढल्यानंतर.
*अधिक माहितीसाठी आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधा…*
• राष्ट्रीय कॉलसेंटर क्रमांक– +91-11-23978046
• राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक—020-26127394
• टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक– 104
*प्रवास करताना काळजी घ्या….*
• सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकणे टाळा.
• पूर्णपणे शिजवलेले अन्न खावे.
• आजारी असलेल्या पाळीव प्राण्यांबरोबर थेट संपर्क आणि प्रवास करणे टाळा.
*हे करा…*
• स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवा.
• साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा.
• शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा.
• सर्दी किंवा फ्लू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजिकचा संपर्क टाळा.
• मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून, उकडून घ्या.
• जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा.
*करोना नियंत्रण कक्ष:-*
सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक 104 करोना विषाणू विषयक शंकासमाधानासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय संचालक, आरोग्य सेवा, पुणे कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून येथील संपर्क क्रमांक 020-26127394 असून तो सकाळी आठ ते रात्री दहा या कालावधीत कार्यरत आहे. नवीन करोना विषाणू आजाराबद्दलच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.
करोना लस :-
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग, पेण येथे प्रत्येकी 1 आणि पनवेल येथील 2 अशा 4 केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील कोविशील्ड लसीकरण मोहिमेसाठी 9 हजार 500 लसी प्राप्त झाल्या आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर त्याच व्यक्तीला दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी सिरम इन्स्टिटयूटने तयार केलेली कोव्हीशिल्ड लस तसेच भारत बायोटेक या उत्पादकाने तयार केलेली कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे.
राज्याला कोविशील्ड व्हॅक्सिनचे 9 लाख 63 हजार डोसेस व कोव्हॅक्सिन लसीचे 20 हजार डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. भारत बायोटेक कडून प्राप्त झालेली कोव्हॅक्सिन लस ही राज्यातील 6 ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये 4 वैद्यकीय महाविद्यालये व 2 जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय व खाजगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. या लसीचे 2 डोस 4 आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत,प्रत्येक लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी शीतसाखळी अबाधित ठेवून लस, लसीकरणासाठी आवश्यक सामुग्री, AD Syringes तसेच AEFI Kit उपलब्ध आहेत. तसेच सर्व संबंधीत कर्मचा-यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
तरीही करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता पाहता सर्वांनी मास्क लावणे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे याचे काटेकोरपणे पालन करणे, ही आताच्या काळाची गरज आहे.