दाग दागिने करण्यासाठी काहीबाही विकून पैशांची साठवणूक करणारी रत्नाक्का… पोराने टाकले तरी त्याच्यासाठी झुरणारी माय… अठराविश्वे दारिद्र्य अनुभवणाऱ्या मराठवाड्यातील प्रत्येक गावात घडणारी ही वास्तव कथा आहे. या कथेचा पहिला भाग –
लेखक- कलीम खाजामियाँ तांबोळी
(ही कथा, सोलापूर जिल्ह्याचा पूर्व भाग, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेत असून ती पूर्णतः काल्पनिक परंतु वास्तववादी आहे.)
१.
रत्नाक्का आज तांबडं फुटाच्या आदीच उटली व्हती. काल सांच्यापारीच तिनं शिरमू धनगराला सांगितलं व्हतं, त्यच्या शेळ्याच्या ट्यांपूसंगं कोंबड्या घिवून यीवू दी मनून. शिरमुनं तांबडं फुटाच्या आदी घरी याला संगितल्यालं. मनून मग रातीच सगळं सावरून ठिवलं व्हतं. तिनं उटून आंगुळ कीली, च्याचा घोट घीटली आन खुर्ड्याकड जाऊन एका एका कुंबडीच्या पायाला धरून भाईर घिवून पायाला चिंदुक बांदून पाटीत भरुलाली. कोंबड्यावाला कळालं कोनतर खुर्ड्यात शिरलंय, त्यनी वरडून वरडून रान उटीवल्या.
‘लहाब..दोन..तीन..चार…..सात….’
सात कोंबड्या आन एक कोंबडा धरली. सगळ्याला पाटीत ठिवली आन पाटी कुंचीत बांदली. पाटी घरात घीटली. धा-बारा दिवसाचे गोळा केल्याले आंडे जवारीच्या पिटाच्या डब्ब्यात व्हते, ती बी मूजली, आन आजून तसंच डब्ब्यात ठिवून डब्बा एका हातपिशवीत नीट ठिवली. दारात यीवून शीळी सूडून तिचं इकुलतं पिल्लू हातात घिवून लाल्या मांगाच्या घराकड निगाली. कोन उटल्याले व्हते, कोन उटून कामाला लागले व्हते, तर कोन कोन परसाकडला चालले व्हते. पिल्ल्याला माय दिसत न्हवती मनून पिल्लू ‘म्या म्या’ करून वरडूलालतं, म्हागं म्हागं येनाऱ्या शीळीला मातर पिल्लू दिसूलालतं. तिनं बी वरडूलाली, जनू ती मनाल्ती ‘मी हाव गं माय म्हागं.’ ह्यवड्या सक्काळी कुनाच्या शेळ्या वरडाल्त्या मनून कोन कोन बगुलाले. आन रत्नाक्काला बगून जिवालाच हासत आपल्या कामाला लागुलाले.
चिमना पाटलीन आंगनात सडा मारूलाल्ती, ती मन्ली,
‘रत्ना, आगं ह्यवडं बारकं पिल्लू हाय आन इकाला चाललीच का काय?’
दातातलं पदराचं टोक सूडून रत्नाक्का मन्ली,
‘ईsss, न्हाई माय, कोंबड्या इकाचित्या. शिरमुच्या गाडीत जाचाय. मनून मन्ले ह्यन्ला लाल्याच्यात सोडावं.’
‘आई आई…’
मनून चिमनानं तांब्या बादलीत बुडीवली. तांब्या भरून घीटली आन त्यच्या तोंडावर हात ठिवून सप्पमन शिपडली. आन रत्नाक्काला मन्ली, ‘आंडे आसतीले तर दी माय, पोरं सुट्टीला याचिते.’
‘आता कोंबड्या खुडूक झाल्त्या वंss, काय दोन चार व्हते ती तितंच लोकं न्हेतीते.’ मनून पुडी चालाली.
जिवालाच मन्ली, ‘तुला देते आंडे!… बाजारात मला एक्या आंड्याचे पाच रुपय मिळतीते आन तुला देते चाराला…’
चालत चालत हिसाब करुलाली…. ‘पाच कमी तीस आंडे मंजी इसाचे शंबर, आन पाचाचे पाच कमी तीस मंजी…शंबर आन पाच कमी तीस व्हतीते. कुंबडी दोनशा शिवी सोडाची नाय, आन कोंबड्याचे कोनबी तीनशे देतंय. शिरमुला हिसाब कराला लावू….’
ही आलंच कि लाल्या मांगाचं घर. लाल्या शेळ्याचं शेन मूतच काडूलाल्ता. खंडीबर शेळ्या त्यच्याच व्हत्या. आन गावातल्या त्यवड्याच राकुळी… आन मदी मदी आसं कुनाला आडचन आली का, त्यनीबी ह्यच्याकड सूडून जाचे.. पाटीचे ईस आन बूकुड आसलं तर तीस रुपय घ्याचा लाल्या एका दिवसाचे. पिल्ल्याचे पैशे घेत न्हवता. लांबूनच त्यनं वळकिल्ता कोनतर यालंय मनून. रत्नाक्काला बगून मन्ला,
‘कोंबड्या न्ह्यालाव जनू आज?’
‘व्हय.’ मनून रत्नाक्कानं पिल्लू खाली सूडली. शीळीचं दावं खुट्ट्याला बांदता बांदता मन्ली,
‘लालू, मला उशीर झाला तर उद्याचा दिवस बी हितच ऱ्हाउ दी, परवादिशी दी मन.’
‘बर बर. आन म्हागलचे बी धा ऱ्हायलीते ती बी द्या मग.’ लाल्यानं ध्यानात आनून दिलं.
‘व्हय गं माय. ध्यानात हाय कि माज्या. देते.’
मनून रत्नाक्का उटली. लाल्याची बायकू वतलापशी बसून पानी तापवूलाल्ती. तिनं मन्ली,
‘आक्का आवो च्या पिवून जावा कि, ठिवते लगीच.’ ‘नगं माय, पिवूनच आलेव म्या. ट्यांपू जाईल.’
मनून रत्नाक्का म्हागारी फिरली. तांबडं फुटाला उलीसाच टायम ऱ्हायला व्हता. पटमन घर गाटली. कडी उगडून मदी गीली. पाटीतल्या कोंबड्यावानी कुर्रर्रर्र कुर्रर्रर्र केल्या. आक्कानं चुंबळ डोक्यावर ठिवली आन पाटी उचलून घीटली, आंड्याची पिशवी हातात घिवून भाईर आली. पिशवी खाली ठिवली आन पाटीचा हात सूडून कवाडाला कुलूप लावली. कंबरंच्या पिशवीत च्यावी टाकली. आन पिशवी उचलून शिरमुच्या घराकड जाऊलाली…गाव हाळू हाळू जागं हुवूलाल्तं. फारूक सळई चा पाना सायकलीला आडकावून टाकीचं पानी सोडाला चालला व्हता. त्यच्याच घरापशी शिरमुचं घर व्हतं.
त्यनं मन्ला,
‘आक्का, जा लवकर, आलाय बग ट्यांपू.’
‘व्हय गं माय, जरा लालूकड गेल्ते शेळ्या सोडाला.’ आसं मनून रत्नाक्कानं पाय उचलला. तसं बी शिरमू काय आक्काला सूडून जानार न्हवता. पन उगच आक्काच्या जीवाला वाटलं. पाटीतली एकांदी कुंबडी मदीच कुर्रर्र कराली. आक्का शिरमुच्या घरापुडी आली, तवा समद्या शेळ्या ट्यांपूत भरल्याल्या व्हत्या. शिरमू आन डायवर च्या पिवूलाल्ते शिरमूनं आक्काला बगिटल्यावर त्यनं बायकुला आजूक एक्या कपात च्या सोदाया सांगिटला. आक्कानं पाटी खाली ठिवली, आन मन्ली,
‘झालं का गं माय?’
शिरमू मन्ला, ‘झालंय झालंय, हिकडी, च्या पिवून निगू.’
येत येतच आक्का मन्ली, ‘पेलेव रे म्या घरी.’
शिरमुची बायकू, इमल मन्ली, ‘पेलतो तर का आमचा नगं वाटालाय का? गरीबाचा कशाला पेचाल माय तुमी?’
‘तुमाला गरीब व्हाला का झालंय माय? देवानं दिलंय कि सगळं.’ मनून आक्कानं च्याचा कप घीटली. शिरमू आन डायवर फाळक्याला दावं बांदूलाले. इमल चुलीत तुराट्या घालून जाळ लावूलालती. ती बगून रत्नाक्का मन्ली,
‘इमल, आगं तुराट्या फरफर जळून जातीत्या आन त्यच्यावर तू सैपाक कराल्याच, बापूच्या शेतात दसकटं हायते मन, ईचुनी?’
‘हं हायते मन माय, जावं.’ इमलनं आसं मन्ली आन फुकारी घिवून चुलीत फुकुलाली.
शिरमूनं हाक मारला. आक्का यीवून पुडी ट्यांपूच्या मुंडक्यात बसली, शिरमूबी वरी चडून म्हागं शेळ्यापशी बसला. डायवरनं आक्काची पिशवी आन पाटी टपावर ठिवला व्हता, आक्कानं त्यला इचारलं,
‘नाग्या, पिशवी कुटाय रं माजी?’
‘हाय कि वरी.’ मनून नाग्या तंबाकू मळूलाला.
रत्नाक्काच्या काळजात धस झालं, ती मन्ली, ‘आरं येड्या त्यच्यात आंड्यायते कि, घी खाली, म्या मांडीवर घिवून बसते.’
नाग्या ट्यांपूच्या दरवाज्यावर हुबारला आन वरची पिशवी काडला. आक्काच्या हातात पिशवी दिवून त्यनं मदी बसला आन गाडी चालू करून शिरमुला मन्ला,
‘मामा, निगाचं का?’
शिरमूनं मान हालवून ‘हं’ मन्ला…………
दिवस कासराबर वरी आलता. जनवाराचा बाजार आटपित आलता, आन तरकारी बाजार भरू लालता. शेतकऱ्यावाच्या मालाच्या गाड्या, यापाऱ्याच्या गाड्या हाळूहाळू बाजारात यीवूलाल्या. शिरमूची दोन शेर्ड ऱ्हायली व्हती. रत्नाक्काच्या सगळ्या कोंबड्या आन आंडे इकून झालते. ती शिरमुकड जाऊन मन्ली,
‘तुमी बाजार करनाराव का?’
‘घ्यावं थोडं माळवं.’ शिरमू मन्ला.
‘आजूक?’ आक्कानं इचारलं.
‘का न्हाई. तुला का घ्याचाय? थांबनाऱ्याच का?’ शिरमूनं इचारलं.
आक्कानं कंबरंच्या पिशवीतले पैशे काडली, त्यच्यातले मूजून साशे रुपय घीटली. आनी बाकीचे शिरमूकड दिली.
‘हीबक माय, ही ठिव तुज्याकड. म्या बाजारात कुटं घिवून हिंडू? मला जरा चपल्या घ्याचित्या, आन सोनाराकड बी जरा कामाय.’
शिरमू घडीबर तिच्या तोंडाकड बगीटला.
‘का बगालाच?’ रत्नाक्का मन्ली.
‘मायला, म्हातारे, तुजे निम्मे लाकडं गेले मसनवाट्याला. पोरगं जावून बसलं तिकडं पुन्याला त्यनं काय तुला इचारत नाय. कुनासाटी कराल्याच? निसते डाग, डाग करून काय मड्यावर बांदून न्हीत्याच का काय?’
आक्कानं बाकीचे पैशे पिशवीत ठिवली. म्होरच्या कप्प्यातून सुपारी आन आडकित काडली,
‘खातुच का?’ शिरमुला इचारली.
‘कातर जरा.’ शिरमू तंबाकूची चंची सोडत मन्ला.
आक्कानं सुपारी कातरली, शिरमूच्या हातावर ठिवली. आजून जरा कातरून तिनं तोंडात टाकली. डायवर नाग्या तितंच हुबारून सगळं ऐकूलालता. त्यनं काय बोलला नाय. शिरमूनं तंबाकूचे दोन इडे केला, एक नाग्याला दिला. आक्कानं नाग्याला मन्ली,
‘नाग्या, माजे कामं हुईपतूर थांबतूच का? शिरमुला जाऊ दी. तुला भजे चारतेव.’
‘हं, तुमच्या भज्यापाई म्या हाजाराचं गिराईक सोडतो.. तुमी देताव का हाजार? देत आसचाल तर थांबतो.’ नाग्या मन्ला.
शिरमूनं थुकत मन्ला, ‘आगं माय माय माय…..हाजार? तिनं मन्ल्याले निस्ते भजे चारुदी मर्दा. वरचा देव खाली ईईल.’
आता जरा आक्काला राग आलता का कि? ती मन्ली,
‘शिरमू, लेकरानु तुमी हाव मनून ह्या गावात मी ऱ्हायलेव. पिंट्या पुन्याला गेला तसा मला इचारीना, गावात तुमाला म्या हाक मारल्यावर तुमीच येताव माय. तुमी मला मागाचे व्हतो. म्या न्हाई मन्ल्यावर बोला.’
आक्काच्या डोळ्यात पानी येवूलाल्त. आता शिरमुला बी जरा कसतर वाटलं. त्यनं मन्ला,
‘आक्का, आगं मस्करीत मन्लो म्या. मला म्हाईताय.’
आक्कानं डोळे पुसली,
‘चला आता तुमाला भजे चारते आज.’
‘खाऊ मन, थांब जरा हेवडे दोन बोकडं जाऊ दी नीट.’ आसं मनून शिरमू तितं आल्याल्या गिराइकाकड वळला.
आक्का जाऊन ट्यांपूत बसली. बसल्या बसल्या उगंच इचार कराली…..
आक्काला दोन लीकी आन एक ल्योक व्हता. लीकीवाचे लग्नं करून दिली व्हती. थूरली सुमन तिनं मंबइला व्हती आन धाकटी लक्षीमी नारंगवाडीत दिल्याली. खाऊन पिऊन सुकात व्हत्या दूगीबी. त्यनीबी कवातर याच्या माईकड. पन पोराची- पिंट्याची कमाल व्हती. ह्यनं मदवा व्हता. गावात काम न्हाई मनून गावातल्या पोरावाच्या नादी लागून पुन्याला गेला. पैलं पैलं याचा जरा गावकड. माईला बी न्हेतो पुन्याला मनाचा. दोन तीन वर्स तितं एक्या रसवंतीवर काम केला मन. पाटलाच्यात फोन कराचा, बोलाचा. कवा गावाला आला कि माईला एकांदं लुगडं आनाचा. आक्का कितीतरी दिवस ती लुगडं येनाऱ्या जानाऱ्या आई बाई ला दाकवायची. पिंट्या ‘पुडच्या टायमाला आलो कि तुला घिऊनच जातो’ मनाचा. आक्का मनाची,
‘बाबा, म्या येते तुज्यासंगट. पन कायम नगं. मला आपलं गाव सूडून नगं बाबा कुटं. तूच वरचीवर येत जा. तुज्याशिवी कोनाय बाबा मला?’ एकदा लैंदी आलाच नाय. त्यला फोन केला तर तितला मालक मन्ला, ‘त्यनं हितलं काम सोडलाय आता.’ कितिंदी तर आक्काचा जीवच लागना झाला. मग कोन तर सांगिटलं, आप्पारावचा बाळ्या आलाय पुन्यावून. ना खातापेताच म्हातारीनं आप्पारावचं घर गाटली. बाळ्या शेताला गेल्ता. त्यनं यीवूजीपतोर बसली तितंच. बाळ्या आला, पन त्यलाबी काय म्हाईत न्हवतं. त्यनं मन्ला,
‘हेव्का आक्का, पुनं काय बारीक न्हाई. लय मोटाय. आन मी हाव मार्कीटला. पिंटूभाऊ स्वारगेटला व्हता तवा गाट पडत व्हती. पन काम बदलून गेला ती काय मला सांगिटलं नाय त्यनं. पन म्या गेलोका, करतो चवकाशी.’
आक्का म्हागारी आली, दोन चार दिवस तिला आन पानी गोड लागना झालं. मन लागना झालं कशातच. मानसाचं मन कसलं आसतंय, उगं त्यला काय काम नसलं कि मग काय बी इचार करतंय. हिच्याबी मनात काय काय यीवूलालं. उगच पाटलाच्या घराकड चक्कर माराची. कोनतर हाक मारल, आन पिंट्याचा फोन आलता मनल. बाळ्या बी पुन्याला जावून पंदरा दिस हून गेले. त्यचा एक दोनदा फोनबी आलता मन. पन त्यनंबी काय सांगिटला नाय. बाळ्याच्या बापाला इचाराला गीली तर त्यनं मन्ला,
‘आक्का, आवो ती शारगाव हाय, आपल्या गावावनी हाय हुई? वड्राच्या घरापशी हाक मारलो आन हिकडं गेनदेवानं हंsss मन्ला. गाटी पडत नस्तीत्या आसं.’
त्यचंबी खरच व्हतं की. आक्कानं कवा पुनं बगिटली व्हती? तिला उंबरगं सूडून दुसरं मोट्ट शारगाव म्हाईत बी न्हवतं.
हाळूहाळू आक्काच्या डोक्यातून पिंटूचा इचार कमी झाला. पर राती झोपताना उगंच इचार कराची. ‘कुटं आसल माजं लीकरू? का करत आसल? का बर फोन करना?……. आन झूपी जाची……
दिपाळी आली, आक्काला वाटलं सनाला ईल. तिनं गऱ्याचे, नुक्त्याचे गोळे कीली. ह्यवडा मोट्टा चिवडा करून ठिवली, लेकराला चांगलं लागतंय मनून. लगट चार पाच दिवस वाट बगिटली. पुन्यात ऱ्हानारे सगळे पोरं सनाला आल्ते. झाडून सगळ्या पोरावाकड गीली. सगळ्याला इचारली. पन कुनालाच पिंटू गाट पडला न्हवता. वड्राचा तम्मा आन पिंटू आदी एक्याच खूलीत ऱ्हात व्हते, त्यला बी काय म्हाईत न्हवतं. त्यनं पर्वादिशी म्हागारी जानार व्हता. तर आक्कानं त्यच्याकड ह्यवडं मोट्ट फराळाचं दिली.
‘पिंटूची गाट पडली तर त्यला दी माय ही.’ आक्काच्या डोळ्याला पानी यालालं. तम्माची आई जवळ आली आन मन्ली,
‘आवो आक्का रडाया का झालं? आसल काय तर आडचन त्यला. कुटं जाईल त्यनं? आपल्या गावातले ह्यवडे पोरं हायते पुन्यात, कुनाच्या तर नदरं पडंलच कि. तुमी रडनुका बर.’
‘आगं कमा, हितून गेल्याला किती दिवस झालते? ना फोन ना कुनापशी निरोप. सगळ्या पोरावाला जावून इचारले, कोनच मनंना गाट पडला त्यनं मनून. दिपाळीला तर ईल मनून वाट बगिटले, पण न्हाई आला.’
अक्काला रडताना बगून कमाबी रडूलाली. चार आया बाया गोळा झाल्या. कोन कोन काय काय मनालं. समजावून कसंतर गप बसली. कमानं घरातून तांब्या भरून पानी आनली.
‘हिंगं पानी, तोंड धिवा. च्या ठीवते म्या.’
आक्कानं पानी घीटली, तोंडावून हात फिरीवली.
धनगराची मुकरा मन्ली,
‘आमचा सच्या मनालता, पाडेगावचं पोरगं आसंच पुन्याला का मंबयला गेलतं मन करून खाला. आन कुटं रिक्षावाल्यासंगं भांडन केला मन. तर त्यनं मानसं आनून ह्यच्या डोस्क्यात धोंडाच घाटलं मन माय. मेलं बगा ती पोरगं.’
आक्कानं तोंडाला पदर लावली आन रडूलाली.
काकीनी मुकराला खवळल्या,
‘ईsss माय मुकरा? काय बी कसं बुल्त्यायच गं तू? रत्ना आगं गप कि तू. डोकं दुकंल माय. सुरेसकड गिल्तीच का?’
कमानं आजून पानी आनली. आक्कानं तोंड धिवली, चूळ भरली.
‘न्हाई वंss. जावं काय?’ जरा पुडी सरकून मन्ली.
काकी मन्ल्या,
‘हिबक आता! जावं का मंजी? आगं तू आदीच का गीली नायच? उद्या सकाळी यी माज्याकड आपुन दूगी बी जावू मन. त्यनं बराब्बर सांगल बग.’
आक्काला जरा आशा वाटली. तिनं येते मन्ली. कमानं चुलीवर च्या ठिवली व्हती. चर्रर्रर्रर्रर्र मन आवाज आला, च्या ला उतू गेलतं………..
क्रमशः
कलीम खाजामियाँ तांबोळी
(उपशिक्षक, पुणे महानगरपालिका)
मूळ गाव- कास्ती (खु.)
मो. नं. – ९०११६४२२१०/९९७५३४७५९६