वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
निलंगा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने दिवाळी निमित्त महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे विक्री व प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ लातूर विभागाचे विभागीय वाहतूक नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते सोमवारी (दि.२५) करण्यात आले.महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती विभाग निलंगाच्या वतीने पंचायत समितीच्या सभापती राधाताई बिराजदार व गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा येथील बसस्थानकावर दि.२५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री प्रदर्शन ठेवले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन सोमवारी (दि.२५) विभागीय वाहतूक नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक बाळासाहेब राठोड, स्थानक व्यवस्थापक दत्तू जाधव, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय मुगळे, तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश, अभियान व्यवस्थापक शरद सन्मुखराव, प्रभाग समन्वयक लिंबराज कुंभार तसेच नितीन रोडे, उमा कोरे, गोविंद रावते, लहाने आदी उपस्थित होते. यावेळी निलंगा बसस्थानक परिसरात १६ गटांनी स्टॉल उभे केले आहेत. या सर्व स्टॉलवर जाऊन मान्यवरांनी फराळाचा आस्वाद घेतला व आवश्यक फराळाची खरेदी केली. महिला सक्षम झाल्या असून त्यांचे उत्पादने विक्रीसाठी बाजारात आली आहेत. त्यामुळे महिला आता आर्थिक क्षेत्रात पण पुढे जात असल्याचे प्रतिपादन क्षीरसागर यांनी यावेळी बोलताना केले.