मनमोहनसिंगांच्या कार्यकाळात २०१२ सालापासून आपण मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणून साजरा करत आलो आहोत.हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे.मेजर ध्यानचंद यांनी हॉकीचा सुवर्णकाळ आणला,म्हणूनच त्यांना हॉकीचे जादूगार असं म्हटलं जातं.हिलटरलाही ध्यानचंद यांच्या खेळाची भुरळ पडली होती. हिटलरने ध्यानचंद यांच्यासमोर जर्मनीचे नागरिकत्व आणि सैन्यातील सर्वोच्च पदवी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.भारत सरकारने १९५६ साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला.खरंतर ध्यानचंद यांना मरन्नोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा ही खूप जुनी सार्वत्रिक मागणी आहे.ध्यानचंद यांचे पुत्र माजी हॉकीपटू अशोक कुमार यांनी २०१९ साली आता यापुढे ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार द्या अशी याचना मी आता यापुढे करणार नाही असे निराश होऊन म्हटले होते.सचिन तेंडुलकरांना भारतरत्न देताना २०१४ मध्ये कायद्यात बदल करून क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले.’भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार पटकावणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण भारतीय आहे.आतापर्यंत १२ जणांना मरन्नोत्तर भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे,म्हणून मोदींनी ध्यानचंद यांना मरन्नोत्तर भारतरत्न पुरस्काराची घोषणा केली असती तर मोठी आनंदाची घटना ठरली असती.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मोदींनी मेजर ध्यानचंद यांना भारतरत्नापासून लांब ठेवले असेच म्हणता येईल.कारण अगोदरच २००२ पासून ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा खेळ जगतातील आजीवन कर्तृत्वासाठीचा भारतीय सरकार तर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे.मोदींना प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून मुख्य विषयाला बगल देण्याची खुबी आहे.मिडियाला विषय भेठेल,सामान्य लोकांना काहीतरी मोठा बदल झाल्यासारखा भास होईल अन् कॉग्रेसचेही खच्चीकरण करण्याची संधी भेटेल.
पण या निमित्ताने लोकांना राजीव गांधीचा ही अभ्यास करावा लागेल.ते फक्त कॉग्रेसचे असतीलही,पण या देशाचे पंतप्रधानही होते.कठोर निर्णय घेताना देशासाठी त्यांना रक्त सांडावे लागले.देशाचे सर्वात तरूण पंतप्रधान राहिलेल्या राजीव गांधींचा १९९१ ला खून झाला तेंव्हा ते देशाचे पंतप्रधान नव्हते.१९८४ ते १९८९ हा त्यांचा कार्यकाळ होता.कॉग्रेसने राजीव गांधींच्या नेतृत्वात १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकल्या होत्या.तत्पपुर्वी इंडियन इअरलाईन्सची वैमानिक पदाची नोकरी सोडून १९८० ला राजकारणात येऊन १९८१ ला शरद यादवांचा पराभव करत राजीव गांधी खासदार झाले होते.क्रिडा क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्काराला राजीव गांधी यांचे नाव दिले गेले ते त्यांच्या मृत्यूनंतर ! तरीही क्रिडा क्षेत्र अन् राजीव गांधी यांचा काय संबंध ?असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला तर नवल नाही.
१९९१-९२ पासून युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने देण्यापाठीमागे दोन कारणे आढळतात. नवी दिल्लीत १९८२ साली आशियाई क्रिडा स्पर्धा झाल्या.राजीव गांधी हे आयोजन समितीचे सदस्य होते.त्यात ते पंतप्रधानांचे सुपुत्र असल्यामुळे आयोजन समितीत त्यांचा वरचष्मा असणं नाकारता येत नाही.या आशियाई क्रिडा स्पर्धेपासूनच भारतात रंगीत टेलिव्हिजन सुरू झाले.या स्पर्धेसाठी दिल्ली शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम्स उभारले गेले.खेळाच्या अनेक प्रकारच्या वास्तू,दिल्लीतील रस्ते,फ्लायव्होअर्स तयार केले गेले.बैंकॉक आणि दिल्ली हे असे दोन शहरे आहेत जिथे आशियाई स्पर्धा दोनदा भरवल्या गेल्या.जर दिल्लीत अशा प्रकारच्या पायाभूत क्रिडा सुविधा झाल्या नसत्या तर आशियाई क्रिडा स्पर्धा भरू शकली नसती.
दुसरं एक कारण असं आढळतं की हा पुरस्कार युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दिला जातो. वयाच्या चाळीसाव्या वर्षी सर्वात तरूण पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांचेच नाव घ्यावे लागते.युवक कल्याण मंत्रालयाने दिवंगत युवक नेत्याचा विचार करावा यात काय आश्चर्य आहे.राजीव गांधी आणि मेजर ध्यानचंद हे दोन्ही भारताचे महान सुपुत्र आहेत.यांच्या नावाचे राजकारण व्हावे हे दुर्दैव आहे.खेळाचे बजेट कमी करून नामांतराचा खेळ करणारे महान खेळाडू मोदी जिवंतपणीच सरदार पटेल स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असं करतात.केवळ नावावरून दिंडोरा पेटवून ध्यानचंदांना भारतरत्नापासून वंचित ठेवण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे हे ही विशेष आहे.
– जगदिश पाटील
कोषाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी,
उस्मानाबाद
(लेखक जगदीश पाटील हे अभ्यासक, कवी आहेत)