वार्तादूत- डिजिटल न्युज नेटवर्क
ज्या घरातील महिला सुशिक्षित असते ते घर कायमस्वरुपी पुढारलेले असते. पण इथल्या अन्यायी व्यवस्थेने महिलांची कायम कुचंबणाच केली. ही अन्यायी गुलामीची शृंखला तोडुन टाकुन महिलांना समतेच्या विचारावर आणुन त्यांना स्वतःच्या अस्मितेची जाण व अस्तित्वाची धमक दाखवुन देण्याचा कार्यक्रम परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने उमरगा तालुक्यातील मुरुम शहरात भव्यदिव्य पध्दतीने पार पडला.
मकर संक्रातीच्या निमीत्ताने तिळगुळ स्नेह मेळाव्याचा हा कार्यक्रम महिलांना जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई, येसूबाई, ताराराणी ह्यांच्या उदात्त विचारधारेने प्रेरित असलेल्या पुस्तकांचे एकमेंकीना वाण म्हणुन वाटप करीत हर्षोल्हासात साजरा केला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस पार्श्वभुमी मोहन जाधव यांनी सांगितले. सूत्रसंचालन पायल लखन शिंदे यांनी केले. प्रास्ताविक किरण गायकवाड यांनी तर महिलांच्या आरोग्याची काळजी या विषयांवर डॉ. सुवर्णाताई पाटील तसेच डॉ. वैशालीताई जाधव यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता असणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडच्या उमरगा तालुकाध्यक्षा रेखाताई पवार यांनी मकरसंक्रातीच्या सणानिमित्त तिळगुळ समारंभ या सोहळ्यात वाण म्हणून पुस्तक वाटप करण्यात आल्याबद्दल तसेच ऐतिहासिक महानायीका यांच्या क्रांतिकारी कार्याबद्दलची माहिती या विषयांवर उत्कृष्ट विश्लेषणासह मनोगत मांडत महिलांना मार्गदर्शन केले. हा प्रबोधनात्मक कार्यक्रम जिजाऊ ब्रिगेडच्या संगीता अशोक जाधव, जयश्री विठ्ठल पाटील, दैवशाला संजय सावंत, सुप्रिया श्रीधर इंगळे, राधा मोहन जाधव, तृप्ती किरण गायकवाड, पायल लखन शिंदे, शितल पाताळे, पुजा शिंदे यांनी राबविला.