वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तब्बल एक वर्षापासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. या संकट काळामध्ये डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आपले प्राण तळहातावर घेऊन कोरोनाशी लढा देत लोकांना वाचवत आहेत. अशा भयंकर महामारीच्या काळामध्ये जिथं रक्ताची नाती सुध्दा पाठ फिरवतात तिथं अगदी निस्वार्थीपणे माणुसकीच्या नात्याने उमरगा येथील खाजाभाई मुजावर हे “कोरोना योद्धा” बनून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी उभे आहेत.
मागील एक वर्षापासून ईदगाह कोविड सेंटरच्या माध्यमातून शेकडो कोरोनाग्रस्तांना ते मदत करत आहेत. गरीब, श्रीमंत असो की कोणत्याही जाती धर्माचा पेशंट असो त्याची पूर्णपणे काळजी घेत त्यांची सर्व व्यवस्था कोविड सेंटरमध्ये केली जाते. कोरोना पेशन्टना औषधा पेक्षाही जास्त मानसिक आधाराची गरज असते. जेव्हा पॉझिटिव पेशंट कोवीड सेंटरमध्ये दाखल होतो तेव्हा खाजाभाईंच्या प्रेमळ शब्दानेच त्याचा अर्धा आजार पळून जातो. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत भाई अविरत सेवेमध्ये तत्पर असतात…. रात्री-अपरात्री देखील एखाद्या पेशंटला इमर्जन्सी निर्माण झाली तर ताबडतोब त्याच्या उपचाराची सर्व व्यवस्था करतात. चहा, नाष्टा, व्हेज, नॉनव्हेज अशा सर्व प्रकारचा सकस आहार पेशंट्सना दिला जातो. त्यामुळे कोवीड सेंटरमध्ये आलेला पेशंट अगदी दहा दिवसात ठणठणीत बरा होऊन आपल्या घरी जातो.
“काफिला उसी के पीछे चलता है,जो अकेले चलने का हौसला रखता है!”
या ओळींप्रमाणे त्यांचे निस्वार्थी कार्य पाहून अनेक समाजबांधवांनी खुल्या मनाने कोवीड सेंटरला मदत केली. कोरोना काळामध्ये गेल्या वर्षभरापासून आपण सर्वजण पाहतोय जिथ कोरोनाग्रस्ताकडे नातेवाईकही पाठ फिरवतात तिथं हा देवदूत सर्व प्रकारची मदत घेऊन उभा आहे….. खरोखरच खाजाभाईंचे कार्य शब्दात वर्णन करणे कठीणच!….. सामाजिक बांधिलकी जपत आम्ही सुद्धा खाजाभाईंच्या कार्यामध्ये खारीचा वाटा उचलून आर्थिक मदत केली….. आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून खाजाभाई मुजावर, डॉ. वैभव शाईवाले आणि सिस्टर यांचा सत्कार केला. यावेळी नितीन सूर्यवंशी सर आणि अनिलभाऊ सगर देखील उपस्थित होते. माझी सर्वांना विनंती आहे की आपणही आपल्या समाज बांधवांसाठी या संकट काळामध्ये जशी जमेल तशी सढळ हाताने मदत करावी….. आपली छोटीशी मदत देखील एखाद्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करु शकते असे आवाहन रेखाताई सूर्यवंशी यांनी केले आहे.
रेखाताई सूर्यवंशी यांचा
पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह प्रवास!
वाचा त्यांच्याच शब्दांत !
थोडीशी ताप, थकवा, डोकेदुखी! अचानक पणे लक्षणं चालू झाली… दोन दिवस ओळखीच्या मेडिकल स्टोअर मधून औषध घेऊन औषधोपचार केला… पण काही तितकासा फरक जाणवला नाही… लागलीच नेहमीप्रमाणे डॉ. तावशीकर सरांकडे गेले आणि त्यांनी कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला.
दोन-तीन दिवसांमध्ये मला अंदाज आलाच होता ही लक्षणं नेहमीच्या आजारापेक्षा थोडीशी वेगळी आहेत… त्यामुळे मी ताबडतोब कोरोना टेस्ट केली आणि अंदाज खरा ठरला…. टेस्ट पॉझिटिव्ह आली! पण मी मनानं जराही विचलित झाले नाही. जेव्हा माणसाच्या मनामध्ये शिवविचार रुजलेले असतात तेव्हा डोकं आपोआप शिवनितीनं काम करायला लागतं! मग ती लढाई कोणतीही असो…
या कोरोना शत्रुशी आपल्याला एक ना एक दिवस लढावं लागणार आहे ही मानसिक तयारी गेल्या वर्षभरामध्ये झालीच होती. त्यामुळे दुःख वाटलं नाही आणि भीतीही वाटली नाही… फक्त आपल्याला याच्यावर यशस्वीपणे मात कशी करायची हे पाहणं गरजेचं होतं……
सिव्हिलच्या नर्सन सांगितलं ‘ मॅडम तुम्ही होम कोरंटाईन होऊ शकता, तुमची लक्षणे सौम्य आहेत…. पण तरीही मी हॉस्पिटलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला…. घरातील लहान मुलं आणि वयस्कर माणसांचा विचार करून मी हा निर्णय घेतला होता. चार तास मी सिविल हॉस्पिटल मध्ये होते…तेव्हा अनेक सिरीयस पेशंट येऊन गेले. त्यांची अवस्था पाहण्यासारखी नव्हती.
त्यानंतर खाजाभाई मुजावर यांना माहीत झाल्याबरोबर ते ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आले. त्यावेळी त्यांनी मला खूप मानसिक आधार दिला. ‘ताई इथली परिस्थिती बरोबर नाही…. हे सगळं वातावरण बघून तुमची मानसिकता बिघडू शकते त्यामुळे तुम्ही ईदगाह कोवीड सेंटरला चला’…. असं म्हणल्या नंतर लागलीच सर्व प्रोसिजर करून आम्ही कोवीड सेंटरला आलो. इथे आल्यानंतर थोडासा नर्वस पणा मनामध्ये होता कारण दहा दिवसापर्यंत सर्व कुटुंबापासून वेगळं राहाव लागणार होत आणि ते गरजेचंही होतं… पण इथल्या प्रसन्न वातावरणामध्ये माझा नर्वसनेस कुठल्याकुठे पळून गेला. आपल्यासारखेच जगण्याच्या जिद्दीने धडपडणारे अनेक कोरोनाग्रस्त पेशंट पाहून माझा आजार निघून गेला. मीच इतरांना मानसिक आधार देऊ लागले.
खाजाभाई मुजावर गेल्या वर्षभरापासून सातत्याने कोरोनाग्रस्त लोकांसाठी अगदी तळमळीने कार्य करत आहेत. त्यांच्याबद्दल मी वर लिहिलेच आहे….. माणसाचा एक आपुलकीचा शब्दही औषधापेक्षा जास्त कार्य करू शकतो याचा प्रत्यय खाजाभाई आणि डॉ. वैभव शाईवाले यांच्या बोलण्यातून आला. तिथं राहिलेल्या दहा दिवसांमध्ये एक कोरोना पेशंट नाही तर “रेखाताई” या आदर युक्त संबोधनाने ट्रीटमेंट मिळाली त्यामुळ मन भरून आलं… अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पेशंटला ट्रीट करणाऱ्या डॉक्टरांच्या मनाचा मोठेपणा प्रचंड कौतुकास्पद आहे!…. अगदी मनमोकळ्या वातावरणात दहा दिवस कसे गेले ते कळले देखील नाही. माझ्या अनुभवातून मला सर्वांना हेच सांगायचे आहे की कोरोना हा जीवघेणा आजार नाही… आपण स्वतःहाच त्याला जीवघेणा बनवत आहोत. कारण जास्त काळ हा आजार घरच्याघरी अंगावर काढला तर हळूहळू त्याचे इन्फेक्शन वाढून पेशंट दगावण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, डोकेदुखी अशी लक्षणं वाटल्यास ताबडतोब कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि कोरोना मुक्त व्हावे.
आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. या सुंदर आयुष्याची काळजी घेणं आपल्याच हातात आहे. अनेक महिला ‘पॉझिटिव’ आले तर लोक काय म्हणतील…. मी पॉझिटिव्ह आले तर मुलांचं, फॅमिलीचं कसं होईल, दहा दिवस कसे राहतील? या भीतीनं टेस्ट करणं टाळत आहेत.पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही घरापासून दहा दिवस दूर राहिला तरी काही हरकत नाही…. आयुष्यभरासाठी दुरावलात तर काय करायचं?… त्यामुळं यामध्ये कोणताही कमीपणा वाटून न घेता लक्षणे जाणवल्यास लागलीच टेस्ट करून औषधोपचाराने पूर्णपणे बरे होऊन राहिलेल्या आयुष्याचा आनंद घेता येईल!
रेखाताई नितीन सूर्यवंशी,
उमरगा
जिल्हा प्रवक्ता, जिजाऊ ब्रिगेड