वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दि. ३ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात बालकांना मेंदुज्वर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दि. ११ जानेवारी पर्यंत लोहारा तालुक्यातील ४८.५२ टक्के बालकांना ही लस देण्यात आली असून यात लोहारा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
महाराष्ट्र शासनाने या टप्प्यात एकूण चार जिल्ह्यामध्ये मेंदूज्वर आजाराच्या प्रतिबंधक लसीचा समावेश नियमित लसीकरणामध्ये करण्याचा निर्णय घेतला असून ही लस सुरुवातीला मोहीम स्वरूपात देण्यात येत आहे. या लसीचा एक डोस सरसकट एक वर्ष ते पंधरा वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात येत असून ही मोहीम ३ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत राबविली जाणार आहे. या मोहिमेतील पहिला टप्पा ३ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण तर १२ ते २२ जानेवारी या कालावधीत क्षेत्रीय स्तरावर गावोगावी अंगणवाडी तसेच उपकेंद्र स्तरावर ही लस देण्यात येणार आहे. या मोहिमेनंतर नियमित लसिकरणात या लसीचा समावेश केला जाणार असून पहिला डोस ९ ते १२ महिने तर दुसरा डोस १६ ते २४ महिने या वयोगटात दिला जाणार आहे.
त्याप्रमाणे दि. ३ ते ११ जानेवारी या कालावधीत शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. दि. ११ जानेवारी पर्यंत लोहारा तालुक्यातील ४८.५२ टक्के बालकांना ही लस देण्यात आली असून यात लोहारा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. दिनांक २२ जानेवारी पर्यंत अंगणवाडी मधील लाभार्थी तसेच शाळाबाह्य, अंगणवाडी बाह्य बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी दिली आहे.
—————
शिक्षण व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वय साधून काम केल्यामुळे चांगले काम झाले. तसेच दुसऱ्या टप्प्यात बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी समन्वय ठेवून जास्तीत जास्त लाभार्थीना मेंदुज्वर लस देण्यात येणार आहे.
डॉ. अशोक कटारे
तालुका आरोग्य अधिकारी