वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जेवळी (दक्षिण) येथे कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर, आर्या प्रकल्पांतर्गत दि. १५ ते २४ मार्च या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर व उमेद यांच्या समन्वयाने गळित धान्य आणि कडधान्य प्रक्रिया या विषयावरील दहा दिवसाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले. प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान बौद्धिक सत्र, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यात कडधान्ये आणि गळीतधान्ये यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती तसेच, अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून यशस्वी उद्योगास भेट असे या प्रशिक्षण चे स्वरूप होते. या प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींना गुरुवारी ( दि.२५) प्रमाणपत्र देऊन या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
शेतीबरोबर एखादा जोड व्यवसाय असल्यास आर्थिक उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण करता येईल आणि कुटुंबाचा चरितार्थ चालविणे सोपे होईल हा या प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यामागची भूमिका आहे. तुळजापूर कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरच्या गृह विज्ञान शास्त्रज्ञ वर्षा मरवाळीकर यांनी महिलांना सक्षमीकरण व उद्योजक या विषयावर मार्गदर्शन करताना सोयाबीन पासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती, गळीत धान्यावर आधारित ऑइल मिल, रेडी टू इट डाळीचे पदार्थ, जवस प्रक्रिया तसेच सोलर ड्रायरद्वारे शेतातील विविध पालेभाज्या सुकवून ड्रायर द्वारे विकल्या जाऊ शकतात हे त्यांनी महिलांना प्रात्यक्षिक आधारे माहिती करून दिली. महिला स्वावलंबी बनू शकतात, जिद्द चिकाटी परिश्रम या गोष्टी अवलंब केल्यास महिला यशस्वी उद्योजक होऊ शकतात असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले. तसेच कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक सचिन सूर्यवंशी यांनी महिला संघटित होऊन व्यवसाय करू शकतात, महिलांना एकत्र येण्याची गरज आहे व महिला गृह उपयोगी प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून त्या मार्केटमध्ये पॅकिंग, लेबलिंग करून चांगल्या प्रकारे विक्री करू शकतात व महिला उद्योजक बनू शकते या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच उमेद अभियाननाचे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार यांनी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी तयार केलेल्या मालास बाजारपेठ उपलब्ध करणे व निधी उपलब्ध करणे करिता उमेद अभियान व कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्या मार्फत माहिती दिली जाईल. त्यामुळे महिलांनी एकत्र मिळून व्यवसाय करावा असे आवाहन केले. प्रभाग समन्वयक अविनाश चव्हाण यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान लोहारा तालुका व कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय गळित धान्य व कडधान्य प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमात जेवळी (दक्षिण) चे सरपंच चंद्रकांत साखरे, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे कार्यक्रम समन्वयक सचिन सूर्यवंशी, गृह विज्ञान शास्त्रज्ञ वर्षा मरवाळीकर, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, प्रभाग समन्वयक अविनाश चव्हाण यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या समारोप कार्यक्रमात पंचशीला विठ्ठल मनोहर, माधव धनराज गोरे, रूपाली प्रदीप कारभारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर हुडेकर यांनी तर मनीषा बसवराज कारभारी यांनी आभार मानले.