वार्तादूत- डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय व प्रगती महिला ग्रामसंघ वडगाव (गां) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वडगांव (गां) येथे दर रविवारी आठवडी बाजार भरवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे या आठवडी बाजाराचा शुभारंभ रविवारी (दि.१४) वडगाव (गां) येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुराव पाटील हे होते. या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी सोपान अकेले, माजी जि प सदस्य दिपक जवळगे, सरपंच बबन फुलसुंदर, पंचायत समितीच्या सभापती हेमलता, रणखांब उपसभापती व्यंकट कोरे, पंचायत समिती सदस्य पद्मिन पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच बबन फुलसुंदर यांनी केले. गावात तयार होणारा भाजीपाला व शेतमाल खरेदी व विक्री गावातच व्हावी, गावातील पैसा गावातच रहावा या उद्देशाने आठवडी बाजाराचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार म्हणाले की, गटातील स्वयंसहायता समूहातील सदस्यांच्या तयार मालाला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या करिता आठवडी बाजाराचे सुरुवात केली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक जवळगे यांनी सेंद्रिय शेतमाल ही काळाची गरज आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच लाकडी घाणा पासून तेल तयार करणे, सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला तयार करुन बाजारामध्ये विक्री करणे, पारंपारिक मसाला व्यवसायामध्ये महिलांनी सहभाग घेऊन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू करावा, या बाजारामध्ये पंचक्रोषितील स्वयंम सहायता गटातील सदस्यांनी आपला माल आणावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गटविकास अधिकारी सोपान अकेले म्हणाले की, स्वयंसहायता महिलांनी बँकेचा विश्वास संपादन करून बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून आपला स्वतःचा व्यवसाय निर्माण केलेला आहे. मिळालेल्या कर्जाची शंभर टक्के परतफेड महिला स्वयंसहायता समूहाकडून होत आहे. याबाबत विश्वास दर्शवलेला आहे. तसेच महिलांना व महिला गटांना गावातील नागरिकांनी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तसेच पुरुषाचे शेतकरी गट, महिलांचे शेतकरी गट या विषयावर सुद्धा त्यांनी चर्चा केली. हा आठवडी बाजार सुरू केल्यामुळे वडगाव (गां) येथील लोकांना बाहेर गावी जाऊन बाजार करणे करिता लागणारा वेळ व पैसा वाचून कुटुंबाची व गावाची प्रगती करिता मदत होईल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी कृषी अधिकारी मुळे साहेब, राजेंद्र माळी, ग्रामसेवक हरिश्चंद्र चौधरी, उपसरपंच लक्ष्मण भुजबळ, पोलीस पाटील मारुती लोहार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हनुमंत दणाने, उपाध्यक्ष मदार गुंडू सय्यद, चेअरमन बिभीषण पवार, बालाजी माळी, प्रभाकर दणाने, छाया पवार, पदमीन फुलसुंदर, वनिता पवार, वडगाववाडी येथील अंकुश भुजबळ, रामलिंगेश्वर युवा मंचाचे पदाधिकारी व ग्रामस्थ गटातील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाळ फुलसुंदर, बळी साळुंके, अण्णा पवार, अमोल साळुंके, पांडुरंग फुलसुंदर, भगवान पाटील, उमेद अभियानाचे सीआरपी मंजुषा लकडे, तनुजा पाटील, सुंदर फुलसुंदर, श्रद्धा पाटील, नसरीन सय्यद , उमेदचे कर्मचारी प्रणिता कटकदौंड, नरेंद्र गवळी, शिवशंकर कांबळे, किशोर हुडेकर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश फुलसुंदर यांनी तर अनतेश्वर माळी यांनी आभार मानले. गावातच आठवडी बाजार सुरू केल्यामुळे गावातील ग्रामस्थ, स्वयंसहाय्यता गटातील सदस्य यांनी समाधान व्यक्त केले आहे.