वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे कृत्रिम अंग निर्माण निगम लिमिटेड( अलिम्को )मुंबई, नौवहन निगम लिमिटेड व पोत परिवहन मंत्रालय,मुंबई यांच्या सीएसआर योजने अंतर्गत समाज कल्याण विभाग जि.प. उस्मानाबाद व निवासी दिव्यांग शाळा, सास्तूर यांच्या सहकार्याने लोहारा तालुक्यातील दिव्यांगांना सहाय्यक साधने व कृत्रिम उपकरणे मोफत वाटपासाठी सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत दि. २८ व २९ जानेवारी या कालावधीत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन भारत कांबळे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलनाने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजाभवानी मतिमंद विद्यालय एकुरगावाडीचे सचिव बालाजी शिंदे हे होते. या कार्यक्रमासाठी अल्मिको मुंबईचे समन्वयक कमलेश यादव, गौरीश साळूंके, वंचित बहुजन आघाडीचे लोहारा तालुकाध्यक्ष रविकिरण बनसोडे, शिबीराचे समन्वयक बी. टी. नादरगे, भौतिकोपचारतज्ञ डॉ. मंगेश कुलकर्णी, प्रा. बी.एम. बालवाड, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष शौकतअली मासुलदार, प्रहारचे लोहारा तालुकाध्यक्ष महंमद अत्तार, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर शिबिरासाठी दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण २०४ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून त्यांचे कृत्रिम पाय, कॅलिपर्स, क्रेचससाठी मोजमाप घेण्यात आले. तसेच व्हीलचेअर, तीन चाकी सायकल, श्रवण यंत्र, ब्रेल काठी, एम.आर. किटसाठी दिव्यांग व्यक्तींची निवड करण्यात आली. या सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींना माहे मार्च २०२१ मध्ये मोफत साहित्य वितरीत करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक अलिम्को, मुंबईचे कमलेश यादव यांनी सांगितले. मागील काळात दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही योजनेचा लाभ घेणेसाठी शासन दरबारी यावे लागत होते. परंतू आता आपल्यासाठीच्या योजना घेवून शासन आपल्या दारी येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा व आत्मविश्वासाने जीवन जगावे. महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून, दिव्यांगांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन भारत कांबळे यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना केले.
मागील २५ वर्षापासून दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे दिव्यांगांच्या वेदना, त्यांच्या गरजा जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे सातत्याने समाजकल्याण विभाग जि प उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या योजना दिव्यांगांसाठी आहेत. त्या योजनेचा लाभ दिव्यांग व्यक्तींना विद्यार्थांना प्रत्यक्ष मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आमच्या शाळेच्या माध्यमातून वेळोवेळी केला जातो. त्यामुळे सदरील शिबिराचा दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे प्रतिपादन कार्यक्रमाचे समन्वयक बालाजी नादरगे यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये केले. अलिम्कोचे कमलेश यादव यांनी निवड झालेल्या दिव्यांगांना लवकरात लवकर दर्जेदार कृत्रिम साहित्य मोफत वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगून, दिव्यांगांना यामुळे सामान्य प्रवाहात येण्यासाठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी उमरगा लोहारा तालुक्यातील दिव्यांग बांधव तसेच शाळेतील दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेवून या दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आर.डी. बेंबडे, आर.ई. इरलापल्ले, बालाजी गुणाले, आर.पी.गुंडूरे, अंजली चलवाड, सुरेखा परीट, ज्ञानोबा माने, गोरक पालमपल्ले, शंकरबावा गिरी, निशांत सावंत, निवृत्ती सुर्यवंशी, दगडू सगर, सुर्यकांत कोरे, भिमराव गिर्दवाड, सुनिता कज्जेवाड, किरण मैंदर्गे, प्रयागताई पवळे आदिंनी परीश्रम घेतले.