वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
केंद्रप्रमुख कार्यालय, माकणी व निवासी दिव्यांग शाळा, सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १८ ) माकणी केंद्रांतर्गत खगोल दुर्बीण असलेल्या शाळातील विज्ञान व भूगोल शिक्षकांसाठी सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत अस्ट्रॉनोमिकाल टेलिस्कोपी सेटिंग अँड ऑपरेटिंग मेथड्स या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यशाळेस सुरूवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी दिव्यांग शाळा सास्तूरचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे हे होते. यावेळी केंद्रप्रमुख एम.जी. वाघमोडे, एस. बी. हायस्कुलचे आर. व्ही.पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेगावचे मुख्याध्यापक दिपक पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थीनी दिपाली घोसले, राधिका मरे, सोनाली बेळे व लक्ष्मी शिंदे यांनी स्वागत गीताने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच विज्ञानाचे बाळकडू पाजून, त्यास विज्ञानवादी आदर्श नागरिक बनविण्याची जबाबदारी घेऊन सर्व शिक्षकांनी कार्य केल्यास येणारी पिढी ज्ञानरचनावादी व सुजाण निर्माण होण्यासाठी मदत होईल. खगोल दुर्बिणीच्या आकाश निरीक्षणाची संधी आपल्या विद्यार्थ्यांना देवून भविष्यातील संशोधक निर्माण करावेत असे प्रतिपादन एस.बी.हायस्कूल जेवळी येथील विज्ञान शिक्षक तथा या कार्यशाळेचे मार्गदर्शक आर.व्ही.पाटील यांनी यावेळी बोलताना केले. सदर कार्यशाळेतील उपस्थित शिक्षकांना प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन सदर कार्यशाळेचे तज्ञ मार्गदर्शक आर.व्ही.पाटील व दिपक पोतदार यांनी केले. माकणी केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी खगोल दुर्बीण उपलब्ध करून दिलेल्या सर्व शाळांचे माकणी केंद्राचे केंद्रप्रमुख एम.जी.वाघमोडे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात अभिनंदन केले. माकणी केंद्र शिक्षणातील अभिनव असे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर राहीले आहे. भविष्यातही माकणी केंद्रातील शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून गुणवत्तेचा ‘माकणी केंद्र पॅटर्न’ निर्माण करावा. केंद्र स्तरावरून त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन कार्यशाळेस उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख तथा या कार्यशाळेचे संयोजक एम.जी.वाघमोडे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी व्ही.के. पवार, श्री शांतेश्वर विद्यालय सास्तूर, शरद पवार विद्यालय राजेगावचे मुख्याध्यापक अविनाश देशमुख यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण वाघमोडे यांनी केले. तर विठ्ठल शेळगे यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी माकणी केंद्रातील विविध शाळेतील भूगोल व विज्ञान विषयाचे शिक्षक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेवून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.