वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुक्यातील सास्तुर येथील जनसेवा महिला प्रभाग संघ यांच्या वतीने घरकुल मार्टचे उदघाटन लोहारा पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब व जिल्हा परिषद सदस्या शितल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सास्तूर येथे पार पडले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष फजल कादरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या शितल पाटील यांनी सास्तूर परिसरातील लाभार्थ्यांनी घरकुल मार्ट मधून साहित्य खरेदी करावे असे आवाहन केले. तसेच घरकुल बांधण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीही प्रशासनासोबत समन्वय ठेवणे बाबतही आवाहन केले. ज्यांची घरकुल अपूर्ण असतील किंवा सुरु केले नसतील त्यांनी तत्काळ आपली घरकुल पूर्ण करून आपले घराचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन केले.
सर्वासाठी घरे हे शासनाचे महत्त्वकांक्षी धोरण आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आदी योजना घरकुलासाठी राबविण्यात येतात. या योजनाची अंमलबजावणी गतिमान व्हावी व घरकुलाचे सर्व साहित्य हे एकत्र मिळावे याकरिता घरकुल मार्टची सुरुवात केल्याचे सहायक गटविकास अधिकारी संजय ढाकणे यांनी सांगितले. तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार यांनी प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, इत्यादी योजना चे जे लाभार्थी आहेत त्यानी घरकुल मार्ट मधून बांधकाम करिता लागणारे साहित्य घेऊन आपली घरकुल पूर्ण करून घेणे बाबत आवाहन केले. तसेच जागतिक महिला दिन दि. ८ मार्च ते जागतिक पर्यावरण दिन ५ जून या कालावधीत राबिण्यात येत असलेल्या महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती यावेळी सांगितली.
या कार्यक्रमाकरिता गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदचे प्रभाग समन्वयक प्रीतम बनसोडे, प्रदीप चव्हाण, प्रदीप लोंढे, सचिन गायकवाड, योगिता थोरात, रेश्मा कादरी यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी तर प्रीतम बनसोडे यांनी आभार मानले.