वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लेखक, वक्ते व सामाजिक कार्यकर्ते ॲड. शितल चव्हाण यांच्या मातोश्री शांताबाई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ॲड. शितल चव्हाण फाउंडेशन उमरगा व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन किल्लारी यांच्या वतीने तालुक्यातील होळी येथे बुधवारी (दि.१७) मोफत प्रशिक्षण व रोजगार मेळावा भरवण्यात आला. या मेळाव्या अंतर्गत १८ ते ३५ वयोगटातील इयत्ता ८ वी ते पदवी अशी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या तरुणांना विविध क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण व त्यानंतर नोकरीच्या संधी देण्यात येणार आहे.
तसेच होळी येथील मागील सात-आठ वर्षांपासून बंद असलेल्या वाचनालयाचे या वाढदिवसानिमित्त पुनरुज्जीवन करण्यात आले. मुळज येथील प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयाशी या वाचनालयाला संलग्न करुन घेत वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. मातोश्री शांताबाई चव्हाण, होळीच्या सरपंच सरोजा बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदाशिव साबळे, उपसरपंच दत्ता चव्हाण, संजय बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. वाचनालयाला विकसित करुन लोकांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी ॲड. शितल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
या दोन्ही कार्यक्रमानंतर मातोश्री शांताबाई चव्हाण यांच्या उमरगा येथील निवासस्थानी संध्याकाळी ग्रंथतूला करण्यात आली. ग्रंथतूलेतील जवळपास २०० पुस्तके वाचनालयाला भेट देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या वतीने जाहीर केले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्य करण्याचा पायंडा ॲड. शितल चव्हाण फाउंडेशनच्या माध्यमातून पडत आसल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. उपक्रम पार पाडण्यासाठी सत्यनारायण जाधव, व्यंकट भालेराव, किशोर औरादे, करीम शेख, सुमित कोथिंबिरे, युसुफ मुल्ला, धानय्या स्वामी, शशीराज पाटील, अनुराधा पाटील, विजय चितली, राजू बटगिरे, शांतय्या स्वामी अदिंनी सहकार्य केले.