वार्तादूत-डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या १३८ जागेसाठी शुक्रवारी (दि.१५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान पार पडले. तालुक्यात सरासरी ७७.३३ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे झालेल्या मतदानात स्त्रियांच्या मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा जास्त आहे.
तालुक्यातील एकूण २६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. यातील आरणी, मार्डी, धानुरी, तावशीगड, राजेगाव या ५ ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध निघाल्या. त्यामुळे तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या १३८ जागेसाठी मतदान प्रक्रिया शुक्रवारी (दि.१५) पार पडली. ग्रामपंचायत निवडणूक ही गावपुढाऱ्यांसाठी प्रतिष्ठेची असल्याने बहुतांश ठिकाणी चुरस निर्माण झाल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास असतात. निवडणुकीत रिस्क नको म्हणून बाहेरगावच्या मतदारांना आणण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. तसेच गावातील मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी वाहनाने त्यांना मतदान केंद्रावर आणले जात होते. बहुतांश ठिकाणी अनेक मतदारांची नावे मतदारयादीत नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे ऑक्सिमिटर व थर्मल स्कॅनिंग तपासणी करण्यात येत होती. वृद्ध, अपंग मतदारांना नातेवाईक मतदान केंद्रावर घेऊन येत होते. मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये, मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी पोलिस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. तीन पोलिस उपनिरीक्षकासह ७२ पोलिस व होमगार्ड तैनात करण्यात आले होते. किरकोळ शाब्दिक वाद वगळता बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत पार पडले.
महिलांचा मतदानाचा टक्का आधिक
तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या एकूण २९२७३ मतदारांपैकी एकूण २२६३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १२०६६ पुरुष व १०५७२ स्त्रियांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पार पडलेल्या मतदानात स्त्रियांच्या मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा अधिक आहे. तालुक्यात सरासरी ७७.३३ टक्के मतदान झाले आहे. मतमोजणी सोमवारी (दि. १८) होणार आहे.
या ग्रामपंचायतीसाठी झाले मतदान
कानेगाव, भातागळी, कास्ती बु, कास्ती खुर्द, लोहारा खुर्द, एकोंडी (लो), मुर्षदपूर, उदतपुर, चिंचोली (काटे), मोघा, बेलवाडी, हराळी, कोंडजीगड, करवंजी, हिप्परगा सय्यद, फनेपुर, भोसगा, दस्तापुर, आष्टाकासार, होळी, करजगाव