वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यात सोयाबीन व कडधान्य साठवणुकीसाठी व्यवस्था नाही. त्यामुळे लोहारा तालुक्यात वखार महामंडळाचे गोडाऊन बांधण्यात यावे अशी मागणी पार्वती बागायतदार शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत पार्वती बागायतदार शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने वखार महामंडळाच्या पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांची शुक्रवारी (दि.२०) भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा जि. उस्मानाबाद येथे वखार महामंडळाचे गोडाऊन उभारणे गरजेचे आहे. लोहारा तालुक्यात सोयाबीन, मूग, तूर, उडीद, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परंतु साठवणुकीचे साधन नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नवीन गोडाऊन बांधण्याची आवश्यकता आहे. याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन तालुक्यात वखार महामंडळाचे गोडाऊन बांधण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पार्वती बागायतदार शेतकरी उत्पादक कंपनीचे आबासाहेब साळुंके, राजू गोसावी, कल्लेश्वर जाधव उपस्थित होते.