वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी करतेवेळी घरगुती बियाणे वापरावे, त्याची उगवण क्षमता तपासावी तसेच बियाणे खरेदी करतेवेळी अधिकृत पावती घ्यावी असे आवाहन पंचायत समितीच्या कृषी विभागाने केले आहे.
खरीप हंगामाबद्दल तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचायत समिती कृषी विभागाने आवाहन केले आहे. यात त्यांनी म्हणले आहे की, खरीप हंगामात पेरणी करताना घरगुती बियाणे वापरून आपला पेरणी खर्चात बचत करावे. घरगुती बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरावे. बाजारातील बियाणे खरेदी करताना अधिकृत पावती घ्यावी, त्यावरील किंमत, लॉट नंबर बरोबर आहे का नाही याची खात्री करावी. बियाणे खरेदी केल्यानंतर त्याची उगवण क्षमता तपासूनच बियाणे पेरावे. जमिनीत पुरेसा ओलावा असेल तरच पेरणी करावी. बियाणे पेरणीपूर्वी कीटकनाशक, बुरशीनाशक बिज प्रक्रिया करून पेरावे. तसेच रायझोबियम, पी.एस.बी. इत्यादीचा बिज प्रक्रियेसाठी उपयोग करावा. ट्रॅक्टरने पेरणी करताना बियाणे जास्त खोलीवर जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच शेतकऱ्यांनी विशिष्ठ कंपनीचा खताचा किंवा विशिष्ठ खताचा आग्रह न धरता रासायनिक खताचा वापर कमी करून शेणखत, हिरवळीचे खते याचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या जमिनीचे व आपले व आपल्या समाजाचे आरोग्य चांगले राहील. तालुक्यात २०-२०-०-१३,१५-१५-१५, ९-२४-२४, २४-२४-०, युरिया, सुपर, पोटॅश डीएपी इत्यादी खते उपलब्ध आहेत. यावर्षी खताचा पुरवठा सुरळीत राहील व शेतकऱ्यांना वेळेवर योग्य प्रमाणात खते वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एम. डि. तिर्थकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कृषी विभागाची, पंचायत समिती कृषि विभाग यंत्रणा कार्यरत आहे. तरी शेतकऱ्यांनी वरील सूचनांचे पालन करून येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे. काही अडचण असल्यास आपल्या गावातील कृषि सहायक, ग्रामसेवक, तसेच तालुका कृषि कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाकडे संपर्क साधावा असे आवाहन पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी किरण निंबाळकर यांनी केले आहे.