वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत आपल्या दर्जेदार आणि आपुलकीचा ठसा उमटवणाऱ्या स्पर्श ग्रामीण रुग्णालयाने या कोरोना महामारीच्या काळात लौकिकास साजेल असे कार्य करून आजच्या परिस्थितीत माणसातील माणुसकी जागवण्याची खरी गरज असल्याचे दाखवून दिले आहे असे गौरवोद्गार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी काढले.
रोटरी क्लब मुंबई अंतर्गत ‘क़्विन नेकलस चारीटेबल ट्रस्टच्या’ व ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूरच्या सहकार्याने जिल्ह्यतील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणत दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोव्हीड-१९ (कोरोना) पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये ज्यांना कुठलीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांसाठी औषधी किटचे वाटप करण्यात येत आहे. लोहारा तालुक्यातील कोव्हीड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी औषधी किटचे वाटप सोमवारी (दि.१०) करण्यात आले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख श्री बाबुराव शहापुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कठारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलीम शेख, माजी नगरसेवक अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, महेबूब गवंडी, खंडू शिंदे आदी उपस्थित होते.
सध्याच्या गंभीर परिस्थितीत मानव सेवा हिच ईश्वर सेवा ठरेल. प्रत्येक व्यक्तींना कोरोनाचा बाऊ न करता या महान सेवा कार्यात स्वतला झोकून द्यावे. मानवतावादि दृष्टीकोन जागृती ठेवल्यास व या कोविड केअर सेंटर मार्फत कोरोना रुग्णांची अतिशय तळमळीने सेवा करणाऱ्या सर्व सेवाव्रतीना आम्ही मानाचा मुजरा करतो. आपण सर्वजन मिळून या कोरोना रुपी राक्षसाला हद्दपार करण्यासाठी खांद्याला खांदा लाऊन काम करू असे उदगार स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी काढले. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने या सर्वांनी विलगीकरण कक्ष सुरु करून कोरोना संसर्ग रोखण्याचे मोठे पाउल अनेक समाज सेवकांनी टाकले आहे. हे सर्वजण सामाजिक बांधिलकीच्या नात्याने हे कार्य करत आहेत. हे अत्यंत कौतुकास्पद कार्य आहे असे प्रतिपादन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले. मुंबई येथील नामांकित अशा तज्ञ डॉक्टरांनी या कीट मधील औषधी रुग्णांसाठी सुचवली आहे. ही औषधी गरजेनुसार या रुग्णांना देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांना याचा उपयोग होणार आहे. ग्रामीण रुग्णालय स्पर्श मार्फत असा मानवतावादी दृष्टीकोन स्थापने पासून राबवला जातो. यामुळे रुग्णांना ग्रामीण रुग्णालय स्पर्श हे आपल घर तर गरोदरमातांना हे माहेर घर वाटते असे उदगार त्यांनी काढले. गरजेनुसार या कोविड केअर सेंटर्सला ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूर मार्फत आणखी कीट पुरविण्यात येतील असेही ते म्हणाले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कठारे यांनीही आरोग्य सेवेतील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच लोहारा व उमरगा तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह परंतु कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी आतापर्यंत जवळपास ७०० कीट वाटपासाठी दिल्या बद्दल ग्रामीण रुग्णालय स्पर्शचे आभार मानले. तसेच स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या ३ फिरत्या वैद्यकीय पथका मार्फत उस्मानाबाद जिल्यातील १०८ गावामध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णाची जवळपास १५० हून अधिक रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. ही १०८ गावे जिल्ह्यातील अति दुर्गम भागात आहेत व लॉकडाऊन असल्यामुळे व परिसरातील भयानक परस्थितीमुळे हे लोक बाहेर पडू शकत नाहीत अशा रुग्णांची तपासणी करून स्पर्श मार्फत गरजेनुसार अशा रुग्णांना नजीकच्या कोविड केअर सेंटरला पाठवण्यात आले व त्यामुळे या १०८ गावातून मोठ्या प्रमाणत होणारा कोरोना संसर्ग रोखता आला असेही डॉ. कठारे म्हणाले.
यावेळी आमदार चौगुले यांनी लोहारा शहरातील दोन्ही कोविड सेंटरमधील रुग्णांची विचारपूस करून समस्या जाणून घेतल्या. तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा सत्कार केला. तसेच कोरोनाच्या काळात कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ सेवा केलेल्या लॅब टेक्निशिअन मुलीचाही सत्कार आमदार चौगुले यांनी केला.
लोहारा तालुक्यातील कोविड विलगीकरण कक्ष जेवळी – २५, माकनाई कोविड विलगीकरण कक्ष माकणी- ५०, आय.टी.आय. कोविड विलगीकरण कक्ष लोहारा – १००, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह कोविड विलगीकरण कक्ष – १०० किट देण्यात आले आहेत.