वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत दि. २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निर्देशानुसार देशाभिमान व्यक्त करण्यासाठी व कायदे विषयक जनजागृती करण्यासाठी शनिवारी (दि. २) तालुका विधी सेवा समिती लोहारा यांच्यावतीने शहरात सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रभात फेरीमध्ये लोहारा न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती एन. एस. सराफ, लोहारा वकील संघाचे अध्यक्ष के. डी. मोरे, वकील संघाचे पदाधिकारी व विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी, अंगणवाडी सेविका व नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. ही प्रभात फेरी लोहारा न्यायालय, शिवाजी महाराज चौक मार्गे बसवेश्वर मंदीरापर्यंत काढण्यात आली. बसवेश्वर मंदिर सभागृह येथे सांगता करण्यात आली. त्यामध्ये कायदे विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने विधी सेवा समिती मार्फत लोकअदालतचे महत्व पटवुन देण्याबाबत तसेच वरिष्ट नागरिकांचे अधिकार, कौटुंबिक हिंसाचार कायदा, रॅंगिंग प्रतिबंधक कायदा यासारख्या कायद्याविषयी माहिती व जनजागृती करण्यासाठी कायदेविषयक घोषणा देण्यात आल्या. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. दिवाणी न्यायालय क. स्तर लोहारा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्रीमती एन. एस. सराफ यांनी आझादी का अमृत महोत्सवच्या औचीत्याने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये पूर्ण भारतभर जनतेमध्ये कायद्याचे ज्ञान पोहचवुन जनजागृती करून अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुशंगाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच कायदा हा सर्वाना समान असल्याचे सांगितले. दि. २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये तालुका विधी सेवा समिती लोहारा व विधीज्ञ मंडळ लोहारा यांच्या वतीने लोहारा तालुक्यामध्ये पथनाट्य, कायदेविषयक शिबीर यांच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कार्यक्रमाकरीता उपस्थित तालुका विधी सेवा समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी दि. २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात येणाऱ्या कायदेविषयक शिबीराचे लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यांनी यावेळी केले. अॅड. टी. एस. मोरे यांनी कायदेविशयक जनजागृती याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भिमाशंकर डोकडे यांनी तर अॅड. आर. बी. जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. के.डी. मोरे, विधीज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष अॅड. एस. आर. भुसणे, विधीज्ञ मंडळाचे सचिव एस. आर. अडसुळे, गटशिक्षणाधिकारी टी. एच. सय्यदा, महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.