वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे शनिवारी (दि.११) रात्री राष्ट्रीय महामार्गावर एका इर्टीगा गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने ही गाडी समोरील एका बलेनो गाडीवर जाऊन आदळली. यामुळे या ठिकाणी काही वेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याच दरम्यान आमदार ज्ञानराज चौगुले हे त्यांचा जेवळी येथील कार्यक्रम आटोपून उमरग्याकडे येत असताना त्या ठिकाणी झालेली गर्दी पाहून त्यांनी आपली गाडी थांबवली. आमदार चौगुले यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली असता एका गाडीत कर्नाटक राज्यातील हुमनाबाद तालुक्यातील हळीकडे या गावातील एक कुटुंब त्यांच्या एका व्यक्तीला सोलापूर येथील वळसंगकर हॉस्पिटल मध्ये मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्याने त्याचा डिस्चार्ज घेऊन गावाकडे परतत होते. दुसऱ्या गाडीत एक आजी त्यांच्या दोन नातवासह धार्मिक कार्यक्रमासाठी हुमनाबाद येथे जात होते. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रसंगावधान राखून येणेगुर येथील शिवसैनिकांची एक गाडी आणायला सांगितली व रुग्ण असलेल्या गाडीतील संपूर्ण कुटुंबियांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था केली व मेकॅनिक बोलवुन दुसरी गाडी तात्पुरती दुरुस्ती करून देऊन त्या कुटुंबीयांनाही जाण्याची व्यवस्था केली. या सर्व परिस्थितीची माहिती मुरूम पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक माळी यांना दिली. वाहनांच्या विमा संदर्भात सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यास सर्वतोपरी मदत करणेबाबत सूचनाही केल्या. याप्रसंगी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शेखर मुदकण्णा, दिलीप येडगे, प्रभाकर येडगे, अशोक बनसोडे, हफीसाब मकानदार, श्रीशैल टोणपे, गणेश माळी, अजगर पांढरे, अविनाश माळी, महेश स्वामी, शिवाजी येडगे, विश्वराज बिराजदार, खंडू कांबळे, येणेगुर पोलीस चौकीचे यशवंत सागर, महबूब शेख व इतर ग्रामस्थ धावून आले.