वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ज्याआधुनिक ‘श्रावणबाळ’ : ३२ वृद्धांना मिळतोय आधार आईवडिलांनी हाताचा पाळणा करून वाढवलं, आजारपणात रात्र-रात्र जागरणं केली, स्वत: काटकसरीने जगून, वेळप्रसंगी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन शिकवलं, लहानाचं मोठं केलं, त्या आईवडिलांची जबाबदारी काही मुलं घेत नाहीत. सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वजण इतके व्यतीत आहेत की, त्यांना घरातील वृद्धांना द्यायला वेळच शिल्लक नाही. त्यांची रवानगी वृद्धश्रमात करतात. अशा एकाकी आणि निराधार जीवन जगणार्या लोकांसाठी एक सत्तर वर्षीय सद्गृहस्थ वृद्धाश्रम चालवतात.
ही कहाणी आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातल्या नळी वडगावच्या गहिनाथ दगडू लोखंडे महाराज या आश्रयदात्यांची. शिक्षण केवळ तिसरीपर्यंतचे. चपल शिवणे, गवंडीकाम, टेलरिंग अाणि ड्रायव्हर अशी मिळेल ते काम करून त्यांनी आयुष्य काढलं. २०१३ गहिनीनाथ महाराज हे केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेला गेले आणि अचानक महाप्रलय आला आणि त्यातून ते सुखरूप बचावले. त्या वेळची घडलेली घटना ही त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण देणारी ठरली. जवळून मृत्यू पाहिलेल्या गहिनीनाथ महाराजांनी उर्वरित आयुष्य हे समाजसेवेसाठी खर्च करायचा असा निश्चय केला.
२०१३ साली श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ नावाचे वृद्धाश्रम सुरू केले. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय गायरान जमिनीवर हे वृद्धाश्रम उभे केले. पत्र्याचे शेड आणि कुडाच्या घरात हे आश्रम चालते. सुरुवातीला ३ वृध्द माणसापासून सुरू केलेल्या या आश्रमात आज ३२ लोक राहतात. यात १३ महिला तर १९ पुरुष आहेत. यातील बहुतांश लोक हे निराधार आहेत. गावोगावी फिरून भिक्षा मागून या वृद्ध लोकांचा सांभाळ गहिनीनाथ महाराज स्वतः करतात. याकामी त्यांच्या साठ वर्षीय पत्नी कौंताबाई लोखंडे मोलाची साथ देते. सर्व लोकांच्या स्वयंपाकाची ते व्यवस्था करतात.
गहिनीनाथ महाराज रोज पहाटे पाच वाजता उठतात. वृद्धांना आंघोळ घालतात. सकाळी सात वाजता हरिपाठाने आश्रमाची सुरूवात होते. सर्वांना सकाळची न्याहारी देऊन गहिनीनाथ महाराज आश्रम चालवण्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्य घेण्यासाठी बाहेर पडतात. महिन्यातून एकदा सर्व वृद्धांची आरोग्य तपासणी केली जाते. या आरोग्य तपासणीसाठी गावालगतचे काही डॉक्टर मोफत वैद्यकीय सेवा देतात. महाराजांच्या या कार्याची महती आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वदूर पोहचत आहे त्यामुळे त्यांना लोकांकडून मदत देखील मिळतेय. त्यातून आश्रम चालवण्यास हातभार लागतोय.
वृद्धांना आधाराची गरज
कामानिमित्त मुले घर सोडून दुरवर जाऊन नोकरी किवा व्यवसाय करतात आणि पर्यायाने घरातील वृद्ध व्यक्तींना मग वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. वृद्ध लोकांना यामुळे मानसिक व सामाजिक आनंद उपभोगता येत नाही आणि मनातील खंतही व्यक्त करता येत नाही. उतार वयात जेंव्हा खऱ्या अर्थाने आधाराची गरज असते, त्याच वेळी निराधार होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवते. हीच गरज ओळखून आणि केदारनाथचा महाप्रलयातून बोध घेत हे वृद्धाश्रम सुरू केले आहे.
संपर्क – 7350523364
मदतीसाठी बँक डिटेल्स महाराष्ट्र बँक खाते क्रमांक – 80030458935
IFSC MAHG0004423
गहिनीनाथ दगडू लोखंडे महाराज
समाजसेवक